हज यात्रेकरू कोल्हापुरात दाखल !! हज फाऊंडेशन आणि लिम्रास ट्रस्टच्यावतीने जोरदार स्वागत
schedule01 Jul 25 person by visibility 249 categoryसामाजिक

कोल्हापूर : केंद्रीय हज कमेटी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य हज कमेटी च्या वतीने यंदा हज यात्रेसाठी गेलेले 276 हज यात्रेकरू सौदी अरेबिया येथील पवित्र मक्का आणि मदिना शहरातील आपले 42 दिवसीय सर्व धार्मिक विधी पूर्ण करून सोमवारी रात्री 9 वाजता कोल्हापुरात दाखल झाले.यावेळी दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंग समोर हज फौंडेशन कोल्हापूरच्या वतीने सर्व हज यात्रेकरूंना गुलाब पुष्प देऊन आणि पेढे भरवून जोरदार स्वागत करण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील 276 हज यात्रेकरू यंदा पवित्र हज यात्रेसाठी रवाना झाले होते.बकरी ईद पर्यंत मक्का आणि मदिना या सौदी अरेबिया येथील पवित्र स्थळावर आपले सर्व धार्मिक विधी गेल्या 42 दिवसात या हज यात्रेकरूंनी पूर्ण केल्यानंतर मदिना येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून थेट मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी या हज यात्रेकरूंचे आगमन झाले.तेथून सर्व सोपस्कार पूर्ण करून खास बसेस द्वारे आजरा,चंदगड,गडहिंग्लज,राधानगरी, भुदरगड,जयसिंगपूर,
कागल,शिरोळ,इचलकरंजी, हातकणंगले,करवीर आणि कोल्हापूर शहरातील सर्व स्त्री पुरुष हज यात्रेकरू कोल्हापुरात आज दाखल झाले.कोल्हापुरात आल्यानंतर या हज यात्रेकरूंनी देशात शांतता प्रस्थापित व्हावी,सर्वधर्मीय बांधवांमध्ये भाईचारा आणि बंधुत्व निर्माण व्हावे आणि एकोपा रहावा यासाठी दुआ केली आणि सर्व हज याक्तरेकरू आपल्या घरी गेले.भर पावसात हज यात्रेकरू दसरा चौकात आल्याने येथील वातावरण सुद्धा पवित्र बनले होते.
यावेळी हज फौंडेशनचे अध्यक्ष हाजी समीर मुजावर, उपाध्यक्ष हाजी बालेचांद म्हालदार,कार्याध्यक्ष हाजी बाबासाहेब शेख, सचिव हाजी इम्तियाज बारगिर, खजानिस हाजी शफी अत्तार ,हाजी समीर पटवेगार, हाजी यासीन उस्ताद,हाजी इम्तियाज बागवान तसेच लिम्रास चॅरिटेबल ट्रस्टचे हाजी इक्बाल देसाई,आदिल देसाई,अफजल देसाई व कलीम खान यांच्यासह मुस्लिम समाजातील मान्यवर उपस्थित होते.