'आरोग्याच्या सवयी बालपणातच दृढ होतात' : स्वच्छता निरीक्षक स्वप्निल उलपे यांचे प्रतिपादन
schedule01 May 26 person by visibility 93 categoryशैक्षणिक
▪️राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११ मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक ११, कसबा बावडा येथे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून एका भव्य आणि प्रेरणादायी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. "आरोग्याच्या उत्तम सवयी या बालपणातच विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे, कारण याच वयात त्या कायमस्वरूपी दृढ होतात," असे प्रतिपादन कोल्हापूर महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक स्वप्निल उलपे यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात स्वप्निल उलपे यांच्या हस्ते दिमाखदार ध्वजारोहणाने झाली. राष्ट्रगीताच्या स्वरांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता. यावेळी बोलताना उलपे यांनी स्वच्छता आणि आरोग्याचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. जी. कीर्तीकर यांनी अत्यंत प्रभावी शैलीत केले, तर उत्तम कुंभार यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची पार्श्वभूमी विषद केली.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये दैदिप्यमान यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. केंद्र मुख्याध्यापक डॉ. अजित कुमार पाटील यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. आपल्या पाल्यांचे यश पाहून उपस्थित पालकांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू तरळले होते. याच कार्यक्रमात 'नवभारत साक्षरता अभियाना'अंतर्गत आर. जी. कीर्तीकर यांनी उपस्थितांना शपथ दिली, तसेच नवसाक्षरांना प्रमाणपत्रांचे वितरण करून त्यांच्या ज्ञानाच्या प्रवासाला शुभेच्छा देण्यात आल्या.
या हृदयस्पर्शी सोहळ्याला रमेश मुजावर, विद्या पाटील, दिपाली यादव, उत्तम पाटील, बालवाडी मुख्याध्यापिका कल्पना पाटील, सावित्री काळे यांसह सर्व शिक्षक, कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह पाहून हा कार्यक्रम केवळ औपचारिक न राहता संस्कार आणि एकात्मतेचा संदेश देणारा ठरला. अमित पोटकुले यांनी आभार मानले.