SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात राज्यातील पहिला ‘महा-पल्स एआय’ आरोग्य प्रकल्प; १०४ शासकीय आरोग्य संस्था होणार डिजिटल यंत्रणेशी जोडल्या जाणार!बिरसा मुंडा जयंतीनिमित्त महापालिकेत अभिवादन; १७ नोव्हेंबरला शहरात आरोग्य व पोषण जनजागृती शिबिर६५ व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेस सोमवारपासून प्रारंभसंभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुखाद्य अनुदानासाठी गोकुळचा पुढाकारईद फेस्टिवलतर्फे आयोजित ‘दीनीयात ज्ञानस्पर्धे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी!राजापूर बंधाऱ्यावर सीसीटीव्ही आणि कायमस्वरूपी कर्मचाऱ्याची नेमणूक करा : आमदार यड्रावकर यांच्या सूचना आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि शांतता सप्ताह: विज्ञानाचा खरा अर्थ मानवी कल्याणासाठीशिवाजी विद्यापीठाच्या ६४व्या वर्धापनदिनानिमित्त ‘दिलखुलास’मध्ये कुलगुरु डॉ. कामत यांची विशेष मुलाखतपंडित नेहरू यांना विद्यापीठात अभिवादन'गोकुळ' दूध दरात लवकरच वाढ होणार? बुधवार-गुरुवारपर्यंत निर्णय शक्यता; नवे अध्यक्ष राजेश पाटील यांची माहिती

जाहिरात

 

कोल्हापुरात राज्यातील पहिला ‘महा-पल्स एआय’ आरोग्य प्रकल्प; १०४ शासकीय आरोग्य संस्था होणार डिजिटल यंत्रणेशी जोडल्या जाणार!

schedule15 Nov 26 person by visibility 102 categoryआरोग्य

🟣 कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून आरोग्य संस्थावर राहणार रिअल-टाइम नजर; आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून प्रकल्पाची उभारणी

कोल्हापूर : सार्वजनिक आरोग्य संस्था मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून आरोग्य व्यवस्थेची गुणवत्ता, पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यात राज्यातील पहिला ‘महा-पल्स एआय’ (MAHA-PULSE AI) प्रकल्प राबविण्यात येत आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून आकाराला येणाऱ्या या प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन सोमवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता रेसिडेन्सी क्लब, कोल्हापूर येथे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत या प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रत्यक्ष वापर करणारा हा राज्यातील पहिला जिल्हास्तरीय प्रकल्प ठरणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या पुढाकाराने तसेच आयआयटी मंडी (IIT Mandi) या नामांकित तंत्रशिक्षण संस्थेच्या तांत्रिक सहकार्याने या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

‘महा-पल्स एआय’च्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधील एकूण १०४ शासकीय आरोग्य संस्थांना एका जिल्हा कमांड सेंटरशी जोडण्यात येणार आहे. यामध्ये १ सामान्य रुग्णालय, ५ उपजिल्हा रुग्णालये, १५ ग्रामीण रुग्णालये आणि ८३ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शहरी तसेच दुर्गम ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांच्या कामकाजावर एकाच ठिकाणाहून देखरेख ठेवणे शक्य होणार आहे.

🟣 एआयच्या माध्यमातून रुग्णालयांच्या कामकाजावर देखरेख
या प्रणालीद्वारे रुग्णालयांमधील डॉक्टरांची उपस्थिती, रुग्णांची गर्दी, रांग व्यवस्थापन, स्वच्छता, हाऊसकीपिंग तसेच आपत्कालीन घटनांवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. एखादा रुग्ण अचानक कोसळणे, रुग्णालय परिसरात आग लागणे किंवा धूर निर्माण होणे यांसारख्या घटनांची प्रणाली तत्काळ ओळख करून संबंधित अधिकाऱ्यांना अलर्ट पाठवेल. तसेच बाह्यरुग्ण विभागातील गर्दी, प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या आणि सरासरी प्रतीक्षा वेळ यांचेही विश्लेषण केले जाणार आहे.

विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची आवश्यकता नाही. आरोग्य संस्थांमध्ये आधीपासून उपलब्ध असलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचाच वापर करून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाद्वारे फुटेजचे विश्लेषण केले जाणार आहे. त्यामुळे उपलब्ध पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर करून आरोग्य व्यवस्थेचे तंत्रज्ञानाधारित व्यवस्थापन करता येणार आहे.

🟣जिल्हा कमांड सेंटरमधून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचा आढावा
या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असलेल्या जिल्हा कमांड सेंटरमध्ये सर्व १०४ आरोग्य संस्थांमधील माहिती, अलर्ट, महत्त्वाच्या घटनांचे अहवाल आणि त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा एकाच डॅशबोर्डवर उपलब्ध होणार आहे. यामुळे आरोग्य व प्रशासकीय अधिकाऱ्यांना रुग्णालयांमधील परिस्थितीची प्रत्यक्ष वेळेत माहिती मिळेल. एखाद्या ठिकाणी समस्या निर्माण झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना देऊन त्यावर झालेल्या कार्यवाहीचा पाठपुरावा करणे शक्य होईल.

🟣रुग्णांना मिळणार अधिक दर्जेदार आणि वेळेत आरोग्यसेवा
या प्रकल्पामुळे डॉक्टरांच्या उपलब्धतेवर देखरेख, रुग्णांच्या प्रतीक्षा वेळेत कपात, रुग्णालयांमधील स्वच्छतेचे प्रभावी व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देणे शक्य होणार आहे. परिणामी रुग्णांना वेळेत तपासणी, उपचार आणि अधिक सुरक्षित वातावरणात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मदत होईल.

रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माहितीची गोपनीयता जपण्यासाठी डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा, २०२३ (DPDP Act) मधील तरतुदींचे पालन करण्यात येणार आहे. सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण संबंधित आरोग्य संस्थेतच स्थानिक पातळीवर केले जाणार असून, त्यातून निर्माण होणारी माहिती आरोग्य सेवांचे व्यवस्थापन सुधारण्याच्या प्रशासकीय उद्देशासाठी वापरली जाणार आहे.

🟣ए आय (AI) सोबत यांचीही असेल नजर
या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमधील कामकाजावर AI बरोबरच उपसंचालक (आरोग्यसेवा), जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती, सर्व पंचायत समितीचे सभापती यांचीही नजर असणार आहे. या सर्वांना प्रणालीचा देखरेख करण्यासाठीचा ऍक्सेस दिला जाणार आहे. यामुळे आरोग्य संस्थावर प्रशासकीय यंत्रणे सोबतच सामाजिक नियंत्रणही राहील.

कोल्हापूर जिल्ह्यातील या प्रकल्पाच्या अंमलबजावणीतून मिळणाऱ्या अनुभवाच्या आधारे राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्येही अशा प्रकारची यंत्रणा राबविण्यासाठी दिशादर्शक प्रारूप विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने ‘महा-पल्स एआय’ हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes