इचलकरंजीत हिट ॲण्ड रन : अपघातात वृध्द ठार
schedule11 Jul 24 person by visibility 430 categoryगुन्हे

इचलकरंजी : येथील सांगली रोडवरील गांधी हॉस्पिटलजवळ कार व मोपेडची समोरासमोर धडक झाली. या अपघातात गौस इमाम मुजावर (वय ६५, रा. पाटील मळा) असे वृद्ध मृताचे नाव आहे. अपघातानंतर कारचालकाने पलायन केले. हा अपघात बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला. हिट ॲण्ड रनच्या प्रकारानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. या अपघाताची नोंद रात्री उशिरा गावभाग पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सांगली रोड परिसरातील पाटील मळा येथे राहणारे गौस मुजावर हे आपल्या मोपेड दुचाकीवरुन महासत्ता चौकातून घराकडे निघाले होते. त्याच दरम्यान जयसिंगपूरकडून भरधाव आलेल्या कारने गौस यांच्या मोपेडला समोरून जोराची धडक दिली. त्यामध्ये गौस हे मोपेडसह रस्त्यावर आदळल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. कारच्या क्रमांकावरून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अपघाताचे वृत्त कळताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे सांगली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.