कांचनताई परुळेकर यांचा वारसा जपणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली - महापौर रूपाराणी निकम; स्मृतीदालनाचे उद्घाटन
schedule26 Mar 26 person by visibility 119 categoryसामाजिक
कोल्हापूर : स्वयंसिद्धा संस्थेच्या संचालिका कै. कांचनताई परुळेकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त कोल्हापूरच्या महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते संस्थेत उभारण्यात आलेल्या 'स्मृतीदालनाचे' भावपूर्ण वातावरणात उद्घाटन करण्यात आले. १९९२ पासून महिला सबलीकरणासाठी ताईंनी दिलेले योगदान अतुलनीय असल्याचे गौरवोद्गार यावेळी महापौरांनी काढले.
महापौर पुढे म्हणाल्या की, "कांचनताईंची दूरदृष्टी, त्याग आणि अथक परिश्रमामुळे अनेक महिलांचे आयुष्य घडले आहे. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना दिलेली खरी श्रद्धांजली ठरेल."
या कार्यक्रमाची सुरुवात स्वयंसिद्धा गीताने झाली. यावेळी ताईंच्या जीवनावर आधारित एक माहितीपट (चित्रफीत) दाखवण्यात आला, ज्यातून त्यांच्या संघर्षाचा आणि यशाचा प्रवास उलगडला. स्मृतीदालन उभारणीसाठी ज्या देणगीदारांनी सहकार्य केले, त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौम्या तिरोडकर यांनी केले, तर आभार जयश्री गायकवाड यांनी मानले.
या स्मृतीदिनाचे औचित्य साधून ग्रामीण भागातील १३ गावांमधील १०० शेतकऱ्यांसाठी 'सेंद्रिय शेती व विक्री व्यवस्थापन' विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. डॉ. दिलीप माळी यांनी यावेळी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोल मिळवून देण्याचा संकल्प याप्रसंगी करण्यात आला.
या कार्यक्रमास संस्थेचे सर्व विश्वस्त, पदाधिकारी, देणगीदार, हितचिंतक आणि स्वयंसिद्धा कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.