पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना; कोल्हापूर जिल्ह्यात २९ हजारांहून अधिक खात्यांची माहिती अपलोड
schedule02 Jul 26 person by visibility 100 categoryराज्य
कोल्हापूर : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा, यासाठी कर्ज खात्यांची तपासणी आणि माहिती अपलोड करण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले असून शासन निर्देशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी दिली .
कोल्हापूर जिल्ह्यातील २९ हजार ६५० शेतकरी कर्जखात्यांचे लेखापरीक्षण पूर्ण झाले आहे .या कर्ज खातेदारांपैकी सुमारे २९ हजार ४०९ खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.उर्वरीत लाभधारकांची माहिती अपलोड करण्याचे काम सध्या सुरु आहे .लवकरच या कर्ज खातेधारकांमधून पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असलेल्या अल्पमुदत पीक कर्जासाठी मुद्दल व व्याजासह जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती देण्यात येणार आहे. दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी ‘एकवेळ समझोता’ ( वन टाइम सेटलमेंट ) योजनेची तरतूद करण्यात आली असून अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंतची मदत मिळणार आहे. याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचाही निर्णय शासनाने घेतला आहे.