पुराच्या पार्श्वभूमीवर आंबेवाडी, प्रयाग चिखली परिसराची पाहणी
schedule20 Jun 25 person by visibility 107 categoryराज्य

कोल्हापूर : करवीर उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांनी आज प्रयाग चिखली, आंबेवाडी व रेडेडोह येथे संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर पाहणी दौरा केला. या वेळी तहसीलदार करवीर, ग्रामस्तरीय सर्व कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पाहणीदरम्यान उपविभागीय अधिकारी चौगुले यांनी सन 2019, 2021 व 2024 मध्ये आलेल्या पुरपरिस्थितीचा आणि त्या अनुषंगाने करण्यात आलेल्या स्थलांतराचा सविस्तर आढावा घेतला. यंदाही संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता नागरिकांचे सुरक्षितपणे स्थलांतर झाल्यानंतर त्यांच्या निवारागृहांची स्थिती चांगली राखण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनास दिल्या.
विशेषतः गरोदर माता, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व जनावरांसाठी सुरक्षित जागी स्थलांतर करण्यावर भर देण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्व ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांनी 24 तास मुख्यालयात उपस्थित राहावे आणि घडणाऱ्या प्रत्येक घटनेची माहिती तात्काळ तालुका नियंत्रण कक्षाला कळवावी, असेही आदेश त्यांनी दिले. या कामकाजात हलगर्जीपणा आढळल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश श्रीमती चौगुले यांनी यावेळी दिले.