पेटंटचे ‘स्टार्टअप’ मध्ये रूपांतर होणे अत्यंत महत्वाचे : डॉ. मोहन वनरोट्टी
schedule18 Dec 25 person by visibility 113 categoryशैक्षणिक
▪️केआयटी आय.आर.एफ.च्या वतीने नवोदितांसाठी ‘पेटंट ओ थॉन’ या स्पर्धेचे आयोजन
कोल्हापूर : अनेक शिक्षक, विद्यार्थी, नवोदित आपापल्या दैनंदिन कामकाजा सोबतच रिसर्च इनोव्हेशन मध्ये चांगले काम करत असतात.अनेकांचे पेटंट देखील असतात. पण या पेटंटला ‘स्टार्टअप’ मध्ये मात्र रूपांतरित करण्याची संधी त्याला प्रत्येक वेळी प्रत्येकाला मिळतेच असे नाही.याचा विचार करून केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन वतीने पेटंट ओ थॉन या स्पर्धेचे आयोजन केले होते .या स्पर्धेची अंतिम फेरी १७-२० डिसेंबर २५ या काळात महाविद्यालयात संपन्न होत आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये देशभरातून विविध ६ राज्यातून जवळपास ९४ जणांनी स्वत;च्या पेटेंट बाबत तपशिल या स्पर्धेसाठी पाठवला. ऑनलाईन परीक्षणाच्या पहिल्या फेरीनंतर ४६ पेटेंटस हे या स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेसाठी ग्राह्य धरले गेले आहेत.या ४ दिवसामध्ये सर्व स्पर्धकांना प्रत्यक्ष समोर येऊन आपल्या पेटेंट बाबत सादरीकरण करायचे आहे. त्याचे परीक्षण करण्यासाठी तज्ञ मंडळींची टीम कार्य करणार आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्र, फार्मास्यूटिकल आणि मॅनेजमेंट या वेगवेगळ्या विषयातील पेटेंट असणाऱ्या नवोदितांना या स्पर्धेसाठी निवडले गेले आहे.ही स्पर्धा २ गटात घेण्यात येत आहे.इंजिनियरिग व मॅनेजमेंट चा एका गट असून दुसरा गट मेडिकल व फार्मास्यूटिकल चा आहे.या स्पर्धेत एकूण रु.८०,००० चे पारीतोषिक देण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन डॉ.मोहन वनरोट्टी, मुख्य अन्वेषक,महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीचे केआयटी इनक्युबेशन सेंटर व संचालक केआयटी यांच्या हस्ते झाले. आपल्या उद्घाटनपर भाषणात ते म्हणाले, “ अनेक प्राध्यापक, विद्यार्थी आपल्या दैनंदिन व्यापातून वेळ काढून रिसर्च च्या माध्यमातून पेटंट मिळवतात. पण हे सर्व पेटंट हे कागदोपत्रात राहू नयेत तर या पेटंटच्या माध्यमातून स्टार्टप्सला चालना मिळावी हा या स्पर्धेचा उद्देश आहे.”. या स्टार्टअप च्या माध्यमातून आपण रोजगाराच्या संधी तर निर्माण करूच पण आपल्या विद्यार्थ्यांसमोर,समाजासमोर उद्योजकतेचा आदर्श उभा करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.आपल्या स्टार्टअप्स मध्ये केआयटी आय.आर.एफ. आपल्याला सर्व प्रकारचे मार्गदर्शन व सहकार्य करेल याबाबत स्पर्धकांना आश्वस्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केआयटी आयआरएफ चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर आरळी यांनी केले. केआयटी आय.आर.एफ.च्या प्रवासाबद्दल व सुरू असलेल्या उपक्रमाबद्दल त्यांनी प्रमुख पाहुण्यांना व उपस्थितांना ओळख करून दिली. ही स्पर्धा चैतन्य रिसर्च अँड टेक्नोलॉजी,आय.पी.इंटलेक्ट सर्व्हिसेस, ॲक्युरस आय.पी.केअर यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. या कार्यक्रमाला डी.एस.टी.निधी आय.टीबीआय, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय,भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी,महाराष्ट्र सरकार यांचे सहकार्य लाभले.स्पर्धेच्या नियोजनात समीर पुनस्कर (इंक्युबेशन मॅनेजर, स्टार्ट अप्स आणि उपक्रम महाराष्ट्र सरकार), देवेंद्र
पाठक (इंक्युबेशन मॅनेजर, बिजनेस आणि ऑपरेशन),श्री ऋषिकेश दुधगावकर, श्री संदीप लाड, श्री पार्थ हजारे यांचे सहकार्य लाभले.संस्थेचे अध्यक्ष श्री.साजिद हुदली,उपाध्यक्ष श्री.सचिन मेनन,सचिव श्री.दीपक चौगुले यांचे मोठे प्रोत्साहन व मार्गदर्शन या उपक्रमासाठी लाभले.





