मुंबई (पूर्व) आरटीओत MH03FB नवीन नोंदणी मालिका सुरू
schedule18 Dec 25 person by visibility 57 categoryराज्य
मुंबई : मुंबई (पूर्व) प्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहन संवर्गातील चारचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी नवीन MH03FB ही मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सध्या वापरात असलेली MH03ES मालिका संपत आल्याने ही नवीन मालिका २२ डिसेंबर २०२५ पासून लागू होणार आहे.
या नव्या मालिकेतून आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करू इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावा. अर्जासोबत पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅन कार्ड तसेच पसंतीच्या क्रमांकासाठीची विहित फी राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकर्षासह Regional Transport Office, Mumbai (East) किंवा RTO, Mumbai (East) यांच्या नावे काढून २४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
एकाच नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास, महाराष्ट्र शासनाच्या ३० ऑगस्ट २०२४ च्या अधिसूचनेनुसार नियमीत फी व्यतिरिक्त सर्वांत जास्त रक्कमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्या अर्जदारास तो नोंदणी क्रमांक देण्यात येणार आहे.
आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक देण्याची सविस्तर कार्यपद्धती कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली असून, अनधिकृत व्यक्तीकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी वाहनधारकांनी स्वतःच आरटीओ कार्यालयात अर्ज करण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी पल्लवी कोठावदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व), २ रा व ३ रा मजला, बी-२ इमारत, वडाळा ट्रक टर्मिनल, वडाळा, मुंबई ४०० ०३७ (इमेल : rto.03-mh@gov.in; दूरध्वनी क्र. ०२२-२४०३६२२१) येथे संपर्क साधावा.





