कसबा बावडयातील झुम प्रकल्प, पुईखडी येथील कचरा डेपो परिसरात बनले दर्जेदार रस्ते
schedule04 Jan 25 person by visibility 297 categoryराज्य
🟣 कृष्णराज महाडिक यांनी पाठपुरावा करून केंद्र सरकारकडून आणला कोटयवधीचा निधी, युटयूब व्हिडीओची फलनिष्पत्ती
कोल्हापूर : इच्छाशक्ती असली तर मार्ग सापडतो आणि समस्या दूर होवू शकते, हे कृष्णराज महाडिक यांनी दाखवून दिलंय. काही दिवसांपूर्वी कृष्णराज यांनी स्वतः कचरा गाडीवर काम करून, कोल्हापूरचा कचराप्रश्न समजून घेतला. कसबा बावडयातील झुम प्रकल्प आणि पुईखडी या दोन ठिकाणी, कृष्णराज महाडिक यांनी जाऊन पाहणी केली आणि टिपर चालकांच्या तसंच त्या परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून निधी आणून, त्या दोन्ही ठिकाणी उत्तम दर्जाचे रस्ते बनवले. त्यामुळे कचरा वाहतुकीची समस्या सुलभ बनलीय.
कृष्णराज महाडिक यांनी पुढाकार घेवून केलेल्या या कामानंतर टिपर चालकांनी त्यांचा सत्कार केला. सुमारे दोन महिन्यापूर्वी कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूरच्या कचरा समस्येविषयी माहिती घेतली. त्यासाठी कृष्णराज यांनी कसबा बावडयातील झुम प्रकल्प आणि पुईखडी इथल्या कचरा डेपोला भेट देवून पाहणी केली. इतकंच नव्हे तर टिपर मधून फिरून काही घरातील कचरा गोळा करून, नागरिकांच्या अपेक्षा आणि टिपर चालकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. झुम प्रकल्प आणि पुईखडी या दोन्ही ठिकाणी कचरा प्रकल्पापर्यंत जाण्यासाठी चांगले रस्ते नव्हते. त्यामुळं टिपरमधील कचरा रस्त्यावरच पडायचा. परिणामी या भागातील नागरिक त्रस्त झाले होते.
खराब रस्त्यामुळं बर्याचदा कचरा वाहून आणणार्या गाडया पंक्चर व्हायच्या. शिवाय चिखल, खाच खळगे यातून मार्गक्रमण करताना चालक वैतागायचे. त्यावेळी कृष्णराज महाडिक यांनी घरोघरी जावून कचरा गोळा करून, या समस्येबद्दलचा व्हिडीओ त्यांच्या युटयूब चॅनेलवर प्रसारीत केला होता. दरम्यान तत्कालिन जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनीसुध्दा तो व्हिडीओ पाहून कृष्णराज महाडिक यांच्या भूमिकेचं कौतुक केलं होतं. इतकंच नव्हे तर महापालिका प्रशासनानं कृष्णराज महाडिक यांना सहकार्याची भूमिका घेतली. केवळ समस्या दाखवून किंवा मांडून गप्प न बसता, कृष्णराज यांनी पाठपुरावा करून केंद्र सरकारकडून भरीव निधी आणून दोन्ही कचरा डेपोजवळील रस्त्याचा प्रश्न सोडवला. खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून १ कोटी १२ लाख रुपयांचा निधी आणून, पुईखडी कचरा डेपो जवळील रस्ता बनवला आहे. तर झुम प्रकल्पाजवळही केंद्र शासनाच्या निधीतून १ कोटी ४० लाख रुपये खर्चून सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनवला आहे. दोन्ही ठिकाणी उत्तम दर्जाचे रस्ते झाल्यानं त्या परिसरातील स्थानिक नागरिक आणि टिपर चालक यांना मोठा दिलासा मिळालाय. त्यामुळं कचरा उठाव करणार्या टिपर चालकांनी कृष्णराज महाडिक यांचा उत्स्फूर्तपणे सत्कार केला.
स्वतःच्या युटयुब चॅनेलवरून कोल्हापूरच्या जिव्हाळयाच्या एक महत्वाच्या प्रश्नाला वाचा फोडली आणि त्यानंतर पाठपुरावा करून, समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्याबद्दल कृष्णराज महाडिक यांचं सर्व स्तरातून कौतुक होतंय.