कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागात अवर सचिव पदावर कार्यरत असलेले केशव जाधव यांची शासनाने कोल्हापूर महानगपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती बाबतचे आदेश नुकतेच जारी केले असून अवर सचिव पदावरून कार्यमुक्त होऊन त्यांनी आज महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला.
मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील असलेल्या केशव जाधव यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. मंत्रालयातील गृहनिर्माण, नगर विकास, उच्च व तंत्रशिक्षण तसेच कामगार या खात्यामध्ये त्यांनी यापूर्वी काम केले असून प्रत्येक विभागात मोठी जबाबदारी पार पाडली आहे. नगर विकास विभागात काम करताना त्यांनी नगर विकासासंबंधित अनेक धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभाग नोंदविला आहे. कामगार विभागात कार्यरत असताना त्यांनी फॅक्टरी ॲक्ट या केंद्र शासनाच्या कायद्यात समाज हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे बदल सुचविणारा राज्य शासनाचा प्रस्ताव तयार करण्यात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. या कायाद्यातील बदलाच्या प्रस्तावास केंद्र शासनाने मान्यता दिल्यानंतर हा सुधारित कायदा सर्व प्रथम महाराष्ट्रात लागू करण्यात आला होता. महिला कामगारांच्या हिताचे रक्षण, फॅक्टरी सुरू करण्यासाठीच्या प्रक्रियेत सुलभता, त्यासाठी वारंवार फॅक्टरी इन्स्पेक्टर च्या कार्यालयास देण्यात येणाऱ्या भेटींचे नियमन करण्यात आले.
या शिवाय केशव जाधव यांनी कोल्हापूर पुरालेखागार या विभागीय कार्यालयात सहाय्यक संचालक म्हणून काम करताना राजर्षि शाहू महाराजांचे कार्य सामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी तसेच मोडीलिपीच्या प्रसाराचे काम पार पाडले. या काळात कोल्हापूर पुरालेखागार कार्यालयाने संकलित केलेले छत्रपती राजाराम महाराजांचे विचार हे पुस्तक ही शासनाच्यावतीने तत्कालिन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित झाले आहे. या शिवाय केंद्र शासनाच्या कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री डिपार्टमेण्टच्या अखत्यारीतील सिप्ज सेज कार्यालयात त्यांनी असिस्टंट डेव्हलपमेंट कमिशनर म्हणून काम केले आहे.