कोरे फार्मसीच्या बी. फार्म अभ्यासक्रमास 'अ' मानांकन
schedule06 Aug 26 person by visibility 105 categoryशैक्षणिक
वारणानगर : वारणा विद्यापीठाचे घटक महाविद्यालय, तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी, वारणानगरच्या बी. फार्म अभ्यासक्रमास क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया व फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड फॉर एज्युकेशन अँड ट्रेनिंग यांच्या रँकिंग अँड रेटिंग ऑफ कॉलेजेस या प्रक्रियेत 'अ' मानांकन पाच वर्षांसाठी प्राप्त झाले आहे. सदर महाविद्यालयामध्ये बी. फार्मसीबरोबरच एम. फार्मसी, फार्म. डी., व डी. फार्मसी हेही अभ्यासक्रम उत्कृष्टपणे राबवले जातात. या मानांकनामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.
विद्यार्थी-केंद्रित शिक्षण, गुणवत्तापूर्ण अध्यापन, संशोधन, आधुनिक पायाभूत सुविधा, उद्योगाभिमुख उपक्रम आणि सातत्यपूर्ण गुणवत्ता संवर्धन या निकषांवर महाविद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत हे मानांकन मिळविले आहे.
वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनयरावजी कोरे यांनी गुणवत्ता मानांकन प्रक्रियेत योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील, कुलगुरू प्रा. (डॉ.) डी. टी. शिर्के आणि श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांचे मार्गदर्शन लाभले.
प्राचार्या, डॉ. कल्पना एस. पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुणवत्ता मूल्यांकन प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. या प्रक्रियेत डॉ. अमोल शेरीकर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच क्यू.सी.आय. समन्वयक डॉ. पोपट एस. कुंभार, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. प्रविण पाटील, डॉ. विनय बागल, पंडित नलवडे, सचिन कट्टीमन्नी तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.