लिंगायत समाजाच्या न्याय्य मागण्यांना आमदार यड्रावकर यांचा जाहीर पाठिंबा
schedule02 Aug 26 person by visibility 160 categoryराज्य
शिरोळ : समस्त लिंगायत समाजाच्या विविध शैक्षणिक, सामाजिक आणि विविध मागण्यांसाठी येत्या ९ ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिरोळचे आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर समाजाच्या विविध मागण्यांसाठी लिंगायत समाजाला जाहीर पाठिंबा दिला असून समाज बांधवांचा प्रश्न शासन स्तरावर सोडवण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.
जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळास स्वायत्त दर्जा देणे, महामंडळासाठी भरीव निधी उपलब्ध करून देणे, लिंगायत विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतिगृहे उभारणे, शैक्षणिक सुविधा वाढविणे, तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य आणि शिष्यवृत्ती उपलब्ध करून देणे या समाजाच्या प्रमुख मागण्या पूर्णपणे न्याय्य असून त्या तातडीने मान्य कराव्यात या मागण्या समाजाच्या आहेत.
यावेळी बोलताना आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले की, समस्त लिंगायत समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तसेच समाजातील विद्यार्थी, युवक, महिला आणि सर्व समाजबांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमी समाजाच्या पाठीशी उभे आहे.
ते पुढे म्हणाले की, युवकांचे उज्ज्वल भविष्य घडविणे, महिलांचे सक्षमीकरण करणे आणि समाजाच्या विकासाला गती देणे हा प्रमुख उद्देश आहे. समस्त लिंगायत समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या या लढ्यात मी कायम समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. शासनाने समाजाच्या विकासासाठी आवश्यक त्या सर्व मागण्या तातडीने मंजूर कराव्यात, यासाठी शासन स्तरावर पूर्ण ताकतीनिशी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले.