महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक 26 एप्रिलला
schedule24 Apr 26 person by visibility 67 categoryराज्य
कोल्हापूर : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक 2026 संदर्भातील अधिसूचना दिनांक 30 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, या निवडणुकीअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांचे मतदान रविवार, 26 एप्रिल रोजी होणार आहे.
मतदान एस्तेर पॅटन हायस्कूल, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, नागाळा पार्क येथे उभारण्यात आलेल्या मतदान केंद्र क्रमांक 1 ते 5 वर सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत पार पडणार आहे. संबंधित मतदारांनी त्यांच्या नावाची नोंद असलेल्या मतदार यादीनुसार संबंधित मतदान केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहून मतदान करणे बंधनकारक राहणार आहे.
मतदारांची ओळख पटविण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र, परिषदेकडील ओळखपत्र किंवा भारतीय निवडणूक आयोगाने मान्यता दिलेले छायाचित्रासहित ओळखपत्र यांपैकी कोणत्याही एका दस्तऐवजाची मूळ प्रत आवश्यक राहील.
मतदान प्रक्रियेसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्राच्या आत मोबाईल फोन नेण्यास मनाई करण्यात आली असून, कोणत्याही प्रकारचे छायाचित्रण किंवा व्हिडिओ चित्रण करण्यासही प्रतिबंध असेल.
सर्व संबंधित मतदारांनी दिलेल्या वेळेत मतदान करून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे अवाहन महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीचे समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) डॉ. संपत खिलारी यांनी केले आहे.