शिरसंगी येथील पर्यावरणीय वारसा लाभलेल्या वटवृक्षास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट
schedule27 Nov 25 person by visibility 54 categoryसामाजिक
▪️नैसर्गिक संवर्धनावर आधारित परिसर विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश
कोल्हापूर : जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील पर्यावरणीय वारसा लाभलेल्या शिरसंगी येथील महाकाय वटवृक्षास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट दिली. त्यांनी गावातील उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधत परिसरातील माहिती जाणून घेतली. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पर्यावरणीय वारसा लाभलेली ठिकाणे आहेत, त्यामधील ठिकाणांपैकी हे एक आहे. अशा या महाकाय वटवृक्षाचे नैसर्गिक संवर्धन करीत तेथील पाच हेक्टर परिसरात नैसर्गिक संवर्धनावर आधारित देवराई उभारण्यासाठी परिसर विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला त्यांनी दिले. यासाठी गावाने आवश्यक सूचना देण्याचेही त्यांनी आवाहन केले. यावेळी गावातील सरपंच, ग्रामस्थ, शेतकरी तसेच तहसीलदार समीर माने, गट विकास अधिकारी सुभाष सावंत उपस्थित होते.
गावकऱ्यांनी यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांचे स्वागत करून त्यांना माहिती दिली. आजऱ्यापासून १० किमी अंतरावर असलेल्या शिरसंगी गावातील या वटवृक्षाखाली जागृत देवस्थान गोठणदेव आहे. शिरसंगी आणि पंचक्रोशीतील भाविक या देवाला खूप मानतात. निसर्गाची कमाल म्हणजे एक ते दीड एकर जागेत वटवृक्ष पसरलेले असून त्याठिकाणी थंडगार वातावरण अनुभवायला मिळते. याठिकाणी आजूबाजूचा परिसरही निसर्गरम्य आहे. प्रसिद्ध ‘जोगवा’ चित्रपटात हा वटवृक्ष दाखवण्यात आला आहे. हे तीनशे वर्षांहून अधिक वयाचे वडाचे झाड असल्याचे लोक सांगतात. शिरसंगी गावातील पर्यावरणीय वारसा असलेल्या महाकाय वटवृक्ष परिसरात देवराई तयार करण्यासाठी आणि तेथील आवश्यक सुशोभिकरणासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी दिल्या.
▪️नैसर्गिक संवर्धनावर आधारित होणार कामे
स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ यांच्या अनुभवाच्या आधारे या ठिकाणी देवराई उभी करण्यासाठी भविष्यात काम करण्यात येणार आहे. संपूर्ण परिसर नैसर्गिकरित्या संवर्धन करून विविध वृक्षलागवड करून देवराई उभारण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. देवराईबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या इतर वनराईंची पाहणीही गावकऱ्यांनी करावी, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या. तसेच शिरसंगी ठिकाणाची माहिती लोकांना देण्यासाठी व एकत्रित माहिती तयार होण्यासाठी तेथील शालेय शिक्षकांना काम देण्यात आले आहे. तसेच त्या ठिकाणी असलेला निसर्ग आणि पर्यावरणाचा वारसा येणाऱ्या पिढीला समजावा यासाठी शालेय सहलीही आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.