केशवराव भोसले नाट्यगृह पुर्नबांधणी कामाची नुतन अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांची पाहणी
schedule17 Jul 25 person by visibility 271 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुर्नबांधणी कामाची नुतन अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी सायंकाळी पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी सुरु असलेल्या कामाचा आढावा घेतला व संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. यानंतर खासबाग मैदानाचीही त्यांनी पाहणी केली.
यावेळी शहर अभियंता रमेश मस्कर, सहायक अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता मिलिंद पाटील, व्यवस्थापक समीर महाब्री, श्री लक्ष्मी हेरिकॉनचे प्रतिनिधी श्रीनिवास पाटील व व्ही.के. पाटील उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील सिव्हिल कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत. ही कामे करताना कोणत्याही प्रकारची घाई अथवा तडजोड होऊ नये, कामे दर्जेदार करावीत अशा सूचना यावेळी संबंधित ठेकेदाराला दिल्या. हे नाट्यगृह कायमस्वरूपी स्वरूपात उपयोगात येणार असल्याने गुणवत्ता आणि टिकाऊपणा आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तिसऱ्या टप्प्यातील अंतर्गत सजावट (इंटिरिअर), ध्वनी प्रणाली (ॲकोस्टिक्स), सीसीटीव्ही, विद्युत व्यवस्था, अग्निशमन यंत्रणा आणि वातानुकूलन यंत्रणेची कामे गोदरेज अॅण्ड बॉईज कंपनी लिमिटेड, मुंबई यांना मंजूर झाली असल्याची माहिती शहर अभियंता रमेश मस्कर यांनी यावेळी दिली.