संजय घोडावत विद्यापीठात एआययू पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय टेनिस स्पर्धांचे आयोजन
schedule06 Jan 26 person by visibility 192 categoryक्रीडा
▪️७ ते ११ जानेवारीदरम्यान देशभरातील विद्यापीठांचा सहभाग
अतिग्रे : संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर येथे असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (AIU) यांच्या मान्यतेखाली पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय टेनिस स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा दि. ७ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार असून, यामध्ये महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश व गोवा या राज्यांतील सरकारी, निमसरकारी व स्वयंवित्त विद्यापीठांमधील सुमारे ६० विद्यापीठांतील ५०० हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.
या स्पर्धांचा उद्घाटन समारंभ मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी संजय घोडावत विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन समारंभाला विद्यापीठाचे कुलपती सन्माननीय संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे तसेच क्रीडा अधिकारी सूर्यजीत घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बी. धीरज कुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
या आंतरविद्यापीठीय टेनिस स्पर्धांमध्ये महिला संघाचे सामने संजय घोडावत विद्यापीठाच्या कॅम्पसमधील टेनिस कोर्टवर, तर पुरुष संघाचे सामने कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन (KDLTA), कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहेत. दोन्ही ठिकाणी आवश्यक त्या सर्व क्रीडा सुविधा, पंच व्यवस्था व स्पर्धेच्या आयोजनाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
या एआययू टेनिस स्पर्धांमध्ये देशभरातील विविध विद्यापीठांमधील पुरुष व महिला खेळाडू सहभागी होऊन आपले क्रीडाकौशल्य, शिस्त व स्पर्धात्मक क्षमता सादर करणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक आवड व शिस्त निर्माण करणे, त्यांच्या क्रीडागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे, राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी देणे तसेच विद्यापीठीन स्तरावर क्रीडा संस्कृती अधिक सक्षम करणे हा या स्पर्धांचा मुख्य उद्देश आहे.
असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (AIU) ही देशातील विद्यापीठीय उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था असून, शैक्षणिक, संशोधन, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात विद्यापीठांमध्ये समन्वय साधण्याचे कार्य करते. AIU च्या माध्यमातून दरवर्षी विविध आंतरविद्यापीठीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते, ज्यातून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडले आहेत.
शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा क्षेत्रातही भरीव योगदान देणारे संजय घोडावत विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत असून, या आंतरविद्यापीठीय टेनिस स्पर्धांचे यशस्वी आयोजन हे विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रातील वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

