तारळे उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम जलद गतीने पूर्ण करा; मार्च महिन्यात लोकार्पणाचे नियोजन : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
schedule07 Nov 26 person by visibility 79 categoryआरोग्य
• कसबा तारळे येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन भव्य इमारत बांधकामाची केली पाहणी
कोल्हापूर : तारळे उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण 1 मार्च रोजी होणार असल्याचे गृहीत धरुन रुग्णालयाचे बांधकाम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करा. हे बांधकाम दर्जेदार पद्धतीने व जलद गतीने करा, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.
राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे येथे उपजिल्हा रुग्णालयाची नवीन भव्य इमारत बांधण्यात येत आहे. या इमारतीच्या कामाची पाहणी करून वैद्यकीय अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या.
यावेळी राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम.डी. देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रवीण कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र शेटे तसेच पदाधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
राधानगरी तालुक्यातील तारळे उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी पालकमंत्री आबिटकर यांनी केली. या इमारतीमध्ये देण्यात येणाऱ्या व आवश्यक असणाऱ्या अन्य आरोग्यविषयक सेवा सुविधांची माहिती त्यांनी घेतली.
रुग्णालयात सध्या उपलब्ध असणारे व आवश्यक असणारे मनुष्यबळ, कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थान, पार्किंग, आवश्यक वैद्यकीय उपकरणे याबाबत त्यांनी चर्चा केली. हे उप जिल्हा रुग्णालय 50 बेडचे असून या ठिकाणी रुग्णांचे स्वतंत्र विभाग, प्रसूतीगृह, अपघात विभाग, हाडांच्या शस्त्रक्रियांचे विशेष साहित्य, एक्स-रे, सोनोग्राफी विभाग, डायलीसीस विभाग आदी विविध विभाग असणार आहेत.
तारळे उपजिल्हा रुग्णालयाला आवश्यक त्या सर्व आरोग्य विषयक सेवा सुविधा देण्यात येणार असून हे रुग्णालय अत्याधुनिक सुविधांनी युक्त होईल, असे पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले. नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी व आरोग्य संपन्न राज्यासाठी आरोग्य विभागामध्ये विविध योजना व अत्याधुनिक सेवा सुविधा देण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नर्स, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.