कोल्हापुरातील शेंडा पार्क मधील जागेची अदलाबदल करण्याची तयारी; कृषी विद्यापीठास पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी : चंद्रशेखर बावनकुळे
schedule09 Apr 25 person by visibility 286 categoryराज्य

मुंबई : कोल्हापूर शहरातील शेंडापार्क येथील जागा आयटी पार्क आणि दंत महाविद्यालयासाठी देण्याची मागणी केली जात होती. तथापि, ही जागा महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या ताब्यात आहे. ही जागा हस्तांतर करून विद्यापिठास पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात यावा, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात याबाबत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे, कृषी विद्यापीठ राहुरीचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कोल्हापूर शहराच्या विकासासाठी शेंडापार्क येथील जागेची अदलाबदल करण्यास महसूल विभागाची तयारी आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जात असेल आणि त्यांची तयारी असेल तर त्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताव पाठवावा.
कृषी विद्यापीठाने आपणास मिळणारी जागा ही शेती आणि संशोधनास योग्य अशी मिळावी आणि जागेच्या अदलाबदलीमध्ये त्या ठिकाणच्या विकासासाठी निधी मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.