सावली पुरस्कार येरळा परिवाराचे नारायण देशपांडे यांना प्रदान
schedule25 Nov 25 person by visibility 71 categoryसामाजिक
कोल्हापूर : समाजकारणातील थोर व्यक्तिमत्त्वांना दिला जाणारा प्रतिष्ठित चतुर्थ 'सावली पुरस्कार' वितरण सोहळा नुकताच कोल्हापूर येथे उत्साहात संपन्न झाला. येरळा प्रोजेक्ट सोसायटीचे सचिव असणारे ज्येष्ठ समाजसेवक नारायण देशपांडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती. रेणूताई दांडेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष कोल्हापूरमधील ज्येष्ठ समाजसेविका अनुराधाताई सामंत होत्या.
नारायण देशपांडे यांनी १९७२ च्या दुष्काळानंतर वंचित कुटुंबांच्या सक्षमीकरणासाठी अथक कार्य केले. कारखानदार होण्याचे स्वप्न असताना नियतीने त्यांना समाजसेवेच्या मार्गावर आणले.
येरळा प्रोजेक्टच्या माध्यमातून संस्थेने ग्रामीण भागात आधुनिक शेती तंत्रज्ञान जलसंधारणाची विविध मार्ग याचबरोबर विज्ञानाचा प्रसार केला. त्यांनी राबवलेल्या अनेक उपक्रमांमध्ये तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्यावर भर दिला आहे असे प्रतिपादन देशपांडे यांनी केले.
शेतीतील विविध प्रयोग शेतीमाल विक्री जलसंधारण शेतीपूरक उद्योग अशा शेतीतील विविध उपक्रमांबरोबरच संस्थेने सोलर व विंडमिल यासारख्या अपारंपारिक ऊर्जा, विज्ञानाधिष्ठित शाळा क्युरीओसिटी सेंटर शाळेतील मुलांना सक्षम करणारे सायकल बँक मुलींसाठीचे निवासी संकुल अभ्यासिका असे विविध उपक्रम राबवले ग्राम सुधार महिला सक्षमीकरण याचेही अनेक उपक्रम संस्थेतर्फे राबविण्यात आले. चलीहाळ व आजूबाजूच्या 22 गावांचा आर्थिक स्तर तर उंचावलाच मात्र दुष्काळ प्रवण असणाऱ्या या या भागात दहा लाख झाडांचे वृक्षारोपण करून या भागाचे तापमान तीन अंशाने कमी करण्यातही संस्थेने मोलाची कामगिरी बजावली.
प्राध्यापक शिरीष शितोळे यांनी मुलाखतीद्वारे नारायण देशपांडे यांचा जीवनप्रवास उलगडून दाखवला. सावली संस्थेचे किशोर देशपांडे यांनी प्रस्तावना केली. जुई कुलकर्णी यांनी उपस्थितांना पाहुण्यांची सविस्तर ओळख करून दिली. तर मानपत्र वाचन सखी गोखले यांनी केले. सूत्रसंचलन रविदर्शन कुलकर्णी यांनी केले.
शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह, तुकारामांची गाथा, कोल्हापुरी गुळाची ढेप, आणि रुपये 51 हजार चा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
या सोहळ्यासाठी कोल्हापुर, पुणे, कागल, पंढरपूर, सोलापूर, बीड, गडहिंग्लज या भागातील अनेक सामाजिक संस्था आणि समाजसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रकाश मेहता, दिलीप बनछोडे, मनीष देसाई, संतोष पंडित, सुरेश खांडेकर, सुरेश सुतार, मंदाकिनी साखरे, कमलाकर बुरांडे, पी एन कुलकर्णी, निना जोशी, अनिल चौगुले, गिरीश अभ्यंकर, अनंत जोशी, प्रवीण लिंबड, सुजाता गवळी, डॉ. दिग्विजय राणेसंकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्काराच्या पूर्वसंध्येला कोल्हापुरातील स्वयंसेवी संस्थांचे एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. याला कोल्हापुरातील 30 स्वयंसेवी संघटनांच्या सुमारे 52 प्रतिनिधींनी सहभागी झाले होते .