शिवाजी विद्यापीठाला राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत तिसऱ्यांदा विजेतेपद
schedule15 Jul 26 person by visibility 88 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : भारत सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयातर्फे आयोजित १७ व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संघाने सलग तिसऱ्यांदा गटस्तर विजेतेपदाची ट्रॉफी पटकावली आहे. यापूर्वी १४ व्या आणि १६ व्या स्पर्धेमध्ये विद्यापीठाने गटस्तरीय विजेतेपद प्राप्त केले होते.
राजधानी नवी दिल्ली येथे संसद भवन परीसरातील बालयोगी सभागृहात केंद्रीय संसदीय कार्य व कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाच्या संघाला विजेतेपदाचा चषक प्रदान करण्यात आला. याबरोबरच शिवाजी विद्यापीठाच्या आठ विद्यार्थ्यांना “गुणवत्तापूर्ण बेस्ट प्रेझेंटर” पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये स्वप्निल माने, संदेश लडकट, नेहा शिंदे, तेजस सन्मुख, श्रेया म्हापसेकर, चंदनकुमार ओझा, श्रुती कुरणे, प्रतिभा बामणे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शिवाजी विद्यापीठ युवा संसद स्पर्धा समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांनाही सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. युवा संसद संघासोबत डॉ. संतोष सुतार उपस्थित होते.
या युवा संसदेमध्ये शपथ ग्रहण करणे, श्रद्धांजली व्यक्त करणे, नवीन मंत्र्यांचे परिचय करणे, प्रश्न कालावधी, विशेषाधिकार भंग प्रस्ताव, आवश्यक अहवाल किंवा दस्तऐवज सभेमध्ये मांडणे, राज्य सभेकडून संदेश लोकसभेमध्ये सादर करणे, विदेशी प्रतिनिधींचे संसदेमध्ये औपचारिक स्वागत करणे, अतीमहत्वाच्या विषयाकडे संसदेचे लक्ष वेधून घेणे, बिल पास करणे, नवीन कायदे, विधेयक प्रस्तावांचा विचार करणे, सभागृह विसर्जित करणे या मुद्यांवर प्रत्यक्ष संसदेप्रमाणे कामकाज चालवले गेले.
🔸️सुसंस्कृत नेतृत्वाच्या जडणघडणीची प्रचिती: कुलगुरू
या स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव, संसदीय प्रक्रिया आणि संवाद कौशल्यांचा विकास साधला जातो. राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या यशामुळे शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्तेची आणि सुसंस्कृत नेतृत्वाच्या जडणघडणीची पुनर्प्रचिती आली, अशा शब्दांत कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले आहे.
विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनीही या संघाचे व समन्वयकांचे अभिनंदन केले आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी डॉ. कविता वड्राळे, डॉ. सुखदेव उंदरे, आकाश ब्राह्मणे, विद्यार्थी विकास विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहकार्य केले.