प्राथमिक शिक्षण समितीच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढीस प्राधान्य द्या, शाळांच्या भौतिक सुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील : आमदार राजेश क्षीरसागर
schedule23 Nov 26 person by visibility 201 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापती शिला सोनुले यांच्या कार्यालयीन प्रवेशाचा सोहळा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते तसेच महापौर रुपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
शहरातील प्राथमिक शिक्षण व्यवस्थेच्या दृष्टीने प्राथमिक शिक्षण समितीची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शहरातील सुमारे 278 प्राथमिक शाळांचे प्रशासन, विविध शैक्षणिक योजनांची अंमलबजावणी तसेच विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्ता विकासाची जबाबदारी या समितीच्या माध्यमातून पार पाडली जाते. सभापतीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शिला सोनुले यांनी शिक्षण क्षेत्रात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.
यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी बोलताना महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या कार्याचे आणि उपक्रमांचे कौतुक केले. शहरातील प्राथमिक शाळांच्या भौतिक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध योजनांअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. शाळांचा पायाभूत विकास, शैक्षणिक सुविधांची उपलब्धता आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्राथमिक शिक्षण समिती सभापती शिला सोनुले यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आगामी काळात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीला राज्यात अग्रेसर बनविण्यासाठी सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि शिक्षकांच्या सहकार्याने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव, सभागृहनेता मुरलीधर जाधव, गटनेते शारंगधर देशमुख, आदिल फरास, प्रभाग समिती सभापती संजय मोहिते, अनुराधा खेडकर, वैभव कुंभार, पाणीपुरवठा विशेष समिती सभापती संगिता सावंत, आरोग्य विशेष समिती सभापती सुरेखा ओटवकर, क्रीडा समिती सभापती विजयसिंह खाडे-पाटील, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, पाणीपुरवठा विशेष समितीच्या उपसभापती दिपा काटकर, महिला व बालकल्याण समिती उपसभापती दिपा ठाणेकर, प्राथमिक शिक्षण समितीच्या उपसभापती पुजा पोवार, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, स्वरुप कदम, नगरसेविका पल्लवी देसाई, माधुरी व्हटकर, जयश्री चव्हाण, डॉ. सुषमा जरग, स्वाती कांबळे, विनायक कारंडे, प्रशासनाधिकारी जयश्री जाधव, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रसुल पाटील, विजय माळी, बाळासाहेब कांबळे, अजय गोसावी, संजय शिंदे, जगदिश ठोंबरे, जयश्री हंकारे, आसमा मुलाणी, राजाराम शिंदे आणि शांताराम सुतार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.