शिवाजी विद्यापीठात ‘स्वररंग’मध्ये विद्यार्थ्यांचे बहारदार सादरीकरण
schedule04 Jan 25 person by visibility 200 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागामध्ये ‘स्वररंग-२०२४-२५’ हा विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम प्रतिवर्षीप्रमाणे आज अत्यंत उत्साहात झाला. कार्यक्रमात गायन, तबला, नृत्य, नाट्यशास्त्र आदी विषयांच्या विद्यार्थ्यांनी आपली कला बहारदारपणे सादर केली.
कार्यक्रमाची सुरुवात भरतनाट्यमच्या विद्यार्थ्यांनी गणेशस्तुती आणि लक्ष्मीस्तुतीने केली. कथ्थकच्या विद्यार्थिनींनी ताल त्रितालमधील शास्त्रीय नृत्यरचना सादर केल्या. नाट्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी ‘पाणी आणि पाऊस’ या विषयांवरील कुसुमाग्रज, ग. दि. माडगूळकर आदींच्या काव्यरचना अतिशय प्रत्ययकारीतेने सादर केल्या. तबल्याच्या विद्यार्थ्यांनी ताल त्रितालमध्ये कायदा, तुकडा, रेला आदी रचना तयारीने सादर केल्या. गायनाच्या विद्यार्थ्यांनी हीच आमुची प्रार्थना, खेळ मांडियेला, हे सुरांनो चंद्र व्हा, सलोना सा सजन, नारायणा रमा रमणा अशी प्रार्थना, भावगीते, भक्तिगीते, अभंग, नाट्यगीते, गझल, गवळण, मराठी-हिंदी भजने आदी वैविध्यपूर्ण गीते बहारदारपणे सादर केली.
कार्यक्रमाला विभागातील शिक्षक व साथीदार संदेश गावंदे, विक्रम परीट, ओंकार सूर्यवंशी यांनी तबलासाथ केली. अमित साळोखे, रणजीत बुगले यांनी संवादिनीसाथ केली.
नृत्यशिक्षिका पद्मश्री बागडेकर आणि भाग्यश्री कालेकर यांचे मार्गदर्शन लाभले. नाट्यशास्त्राची विद्यार्थिनी आसावरी लोहार हिने सूत्रसंचालन केले. विभागप्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी प्रास्ताविक केले. अतुल परीट यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.