डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये 'मायक्रोसॉफ्ट'कडून ‘कॅम्पस टू कॉर्पोरेट’ची यशस्वी चर्चा
schedule05 Sep 26 person by visibility 89 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी 'मायक्रोसॉफ्ट'चे कॅम्पस रिक्रुटमेंट स्पेशालिस्ट अकिब शेख यांचे ‘कॅम्पस टू कॉर्पोरेट’ या विषयावर माहितीपूर्ण, प्रेरणादायी व मार्गदर्शक व्याख्यान संपन्न झाले. इन्स्टिट्यूटच्या पदवी व डिप्लोमा विभागातील कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अकिब शेख म्हणाले, “आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळविणे पुरेसे नसून विद्यार्थ्यांनी सातत्याने स्वतःचा स्किलसेट विकसित केला पाहिजे. रेझ्युमे हा विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाची, ज्ञानाची आणि क्षमतांची पहिली ओळख असते. त्यामुळे तो वास्तववादी, स्पष्ट आणि प्रभावी असावा . प्रोजेक्टमध्ये केवळ समूहाचा सदस्य असणे महत्त्वाचे नाही, तर त्या प्रोजेक्टमध्ये आपण स्वतः नेमके कोणते योगदान दिले, हे स्पष्टपणे सांगता आले पाहिजे. ग्रुप डिस्कशनमध्ये केवळ जास्त बोलण्यापेक्षा विषयाला धरून अर्थपूर्ण आणि समर्पक बोलणे अधिक महत्त्वाचे आहे.आपल्या विचारांमध्ये स्पष्टता असावी आणि आपले मत आत्मविश्वासाने मांडण्याची क्षमता विद्यार्थ्यांनी विकसित केली पाहिजे.ज्या कंपनीमध्ये आपण नोकरीसाठी प्रयत्न करीत आहोत, त्या कंपनीच्या कार्यपद्धती, संस्कृती, तंत्रज्ञान आणि अपेक्षांबाबत सखोल माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी पेटंट, नावीन्यपूर्ण प्रकल्प आणि तंत्रज्ञानाधारित स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपली क्रिएटिव्हिटी आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करावी.माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सतत बदल होत असल्याने सातत्याने शिकणे अत्यावश्यक आहे. लर्न , रिलर्न आणि अनलर्न ही प्रक्रिया आपल्या करिअरचा अविभाज्य भाग बनविली पाहिजे. चाकोरीबाहेरचा विचार, महाविद्यालयीन तसेच महाविद्यालयाबाहेरील तंत्रज्ञान स्पर्धा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतःसाठी उत्तम करिअरच्या संधी निर्माण करू शकतात.”
अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता उद्योगक्षेत्राच्या गरजा ओळखून स्वतःमध्ये आवश्यक कौशल्ये विकसित केली पाहिजेत. मायक्रोसॉफ्टसारख्या जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान कंपनीतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उद्योगविश्व समजून घेण्यासाठी आणि आपल्या करिअरची योग्य दिशा ठरविण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी अशा मार्गदर्शनाचा पुरेपूर लाभ घेऊन सातत्यपूर्ण प्रयत्न, नावीन्यपूर्ण विचार आणि कठोर परिश्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या संस्थेचे नाव उज्ज्वल करावे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक विरेन भिर्डी यांनी केले. यावेळी ते म्हणाले, “आज उद्योगक्षेत्रात तंत्रज्ञानाचा वेगाने विस्तार होत असून विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच उद्योगाच्या अपेक्षा समजून घेणे आवश्यक आहे. महाविद्यालयीन जीवनापासून व्यावसायिक जीवनाकडे होणारा प्रवास यशस्वी करण्यासाठी ज्ञान, संवादकौशल्य आणि आत्मविश्वास यांचा योग्य समन्वय आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगविश्वातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे, या उद्देशानेइन्स्टिट्यूटमध्ये सातत्याने अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मायक्रोसॉफ्टसारख्या जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान कंपनीतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरेल.”
इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी प्रमुख वक्ते अकिब शेख यांचा परिचय करून दिला. त्यांनी जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान क्षेत्रातील भरती प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या व्याख्यानाचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. अकिब शेख यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे सविस्तर निरसन केल्याने कार्यक्रम अत्यंत संवादात्मक आणि उत्स्फूर्त वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन तसेच महाविद्यालयाबाहेरील तंत्रज्ञान स्पर्धा, हॅकॅथॉन, पेटंट आणि प्रकल्पांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन लाभले. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे संचालक डॉ. करण पाटील यांनी आभार मानले. यावेळी डीन (अकॅडेमिक्स ) डॉ. पूर्वा वाइंगणकर, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. आरती चव्हाण आणि प्रा. रोहिणी रसाळ यांनी सूत्रसंचालन केले.