तर्कसंगत विचारांना एआय पर्याय असू शकत नाही राजश्री मोरे : माध्यम संशोधन विषयावर विद्यापीठात कार्यशाळा
schedule05 Sep 26 person by visibility 144 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : एआयमुळे माध्यम संशोधनास मदत होत आहे. अनेक गुंतागुंतीच्या डेटावर प्रक्रिया करण्यासाठी एआय संशोधकांना सहायभूत ठरत आहे. तथापि, ते मानवी मेंदूला आणि तर्कसंगत विचारांसाठी पर्याय असू शकत नाही, असे मत संगणकशास्त्र अभ्यासक राजश्री मोरे यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागात पीएम उषा अंतर्गत आयोजित माध्यम संशोधन विषयावरील कार्यशाळेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव होते.
विद्यापीठाच्या संशोधन आणि विकास केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा झाली. यावेळी ग्रंथालय शास्त्रातील संशोधक अतुल नगरकर व्यासपीठावर उपस्थित होते.
मोरे म्हणाल्या, एआयमुळे माहिती मिळवणे आणि त्यावर प्रक्रिया करणे सोपे झाले आहे. पण या माहितीवर सरसकट विश्वास ठेवणे घातक आहे. माहितीची खातरजमा करणे सर्वात मोठे आव्हान आहे. एआयमुळे संशोधनाचे काम सोपे होत असले तरी त्यातून संशोधकांची विश्लेषण आणि चिकित्सक दृष्टी हरवण्याचा धोका निर्माण झाला आहे. एआयचा वापर करत असताना नैतिकेला सर्वाधिक महत्त्व देणे आवश्यक आहे. संशोधनाची गुणवत्ता आणि विश्वासार्हता वाढविण्यासाठी या तंत्राचा अत्यंत जबाबदारीने वापर केला पाहिजे.
अतुल नगरकर यांनी माध्यम संशोधनाची प्रक्रिया विशद केली. ते म्हणाले, संशोधक तटस्थ असणे आवश्यक आहे. संशोधन करताना शिस्त आणि संशोधन पद्धती कटाक्षाने अवलंबल्या पाहिजेत. अन्य संशोधकांनी केलेल्या संशोधनाचे संदर्भ देणे आवश्यक आहे. इतरांचे संशोधन आपले म्हणून प्रसिद्ध करणे ही गंभीर बाब असून संशोधकांनी हे टाळले पाहिजे. संशोधनातून नवनिर्मिती होत असल्याने वस्तुनिष्ठ आणि जबाबदारीने संशोधन करणे हे संशोधकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
जयप्रकाश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुमेधा साळुंखे यांनी स्वागत केले. प्रीती भिसे आणि सायली गणेशकर यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. आभार श्रावणी कालेकर हिने मानले.