चैनीसाठी घरचाच घात! वडिलांच्याच घरातून लांबवले १० लाखांचे दागिने; करवीर पोलिसांकडून घरफोडीचा पर्दाफाश, चक्क 'मुलगाच' निघाला चोर
schedule29 Sep 26 person by visibility 65 categoryगुन्हे
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील शांकभरी कॉलनी, शिंगणापूर येथे सुनील बंडगर यांच्या घरी झालेल्या १० लाख ३२ हजार रुपयांच्या घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उघडकीस आणला असून, खुद्द फिर्यादीच्या मुलानेच चैनीसाठी हा कट रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त केली आहे.
दिनांक २८/९/२०२६ रोजी करवीर तालुक्यातील शांकभरी कॉलनी शिंगणापूर येथील राहणारे सुनील बंडगर यांच्या घरी घरफोडी होऊन त्यामध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली होती. याप्रकरणी फिर्यादी सुनील सुखदेव बंडगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना जिल्ह्यात घडलेल्या घरफोड्या, दरोडे व जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन आणि सूचना दिल्या होत्या. पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी पथके तयार केली होती.
तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील अंमलदार शुभम संकपाळ व युवराज पाटील यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, शांकभरी कॉलनी येथील झालेली घरफोडी चोरी ही फिर्यादी यांचा मुलगा यश बंडगर यानेच केली असून, तो हा मुद्देमाल लक्षतीर्थ वसाहत येथे विक्रीसाठी घेऊन जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी लक्षतीर्थ वसाहत ते शिंगणापूर जाणारे रोडवर सापळा रचून यश बंडगर यास ताब्यात घेतले.
आरोपीकडे चौकशी केली असता त्याच्याकडून १०,३२,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून आली, जी कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करण्यात आली. तसेच त्याने चैनीसाठी स्वतःच्याच घरी चोरी केल्याची कबुली दिली. गुन्ह्यातील मुद्देमाल करवीर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालींदर जाधव आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या इतर अंमलदारांनी केली आहे.