गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला; १८ ऑक्टोबरला मतदान, १९ ला निकाल
schedule09 Sep 26 person by visibility 69 categoryउद्योग
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली असून, येत्या १८ ऑक्टोबर रोजी मतदान तर १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकीसाठी १५ ते २२ सप्टेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. अंतिम मतदार यादीचा घोळ अद्याप कायम असला, तरी निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रातील हालचालींना प्रचंड वेग आला आहे.
◼️महत्त्वाच्या तारखांचे टप्पे
* १५ ते २२ सप्टेंबर: उमेदवारी अर्ज दाखल करणे
* २३ सप्टेंबर: अर्जाची छाननी
* २५ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर: अर्ज माघार मुदत
* ९ ऑक्टोबर: अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध
* १८ ऑक्टोबर: मतदान
* १९ ऑक्टोबर: मतमोजणी व निकाल
यंदाच्या निवडणुकीत एकूण २५ संचालक निवडून येणार आहेत. यात सामान्य प्रवर्गातून २०, महिला २, अनुसूचित जाती-जमाती १, इतर मागासवर्गीय १ आणि भटक्या-विमुक्त जाती प्रवर्गातून १ प्रतिनिधीचा समावेश असेल. तसेच स्वीकृत प्रवर्गात तज्ञ आणि शासन नियुक्त संचालकांचा समावेश असणार आहे.
सहा ऑक्टोबर रोजी अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर अवघ्या ११ दिवसांचा प्रचार काळ मिळणार असल्याने नेत्यांची धावपळ वाढली आहे. महायुतीमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी असून जागावाटपाची अंतर्गत चुरस नेत्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची रणनीती आणि महायुतीची तयारी यामुळे ही निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार हे निश्चित असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.