डॉ. बापूजी साळुंखे इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये बी.टेक अभियांत्रिकीच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उत्साही प्रारंभ
schedule11 Mar 25 person by visibility 227 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ.बापूजी साळुंखे इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजि, कोल्हापूर येथे बी.टेक अभियांत्रिकीच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा भव्य आणि उत्साही प्रारंभ शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर झाला. क्रीडा संस्कृती रुजवण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धांच्या उद्घाटन सोहळ्यास श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे, प्रमुख अतिथी डॉ. शरद बनसोडे (संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), प्रा. किरण पाटील (क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्री. विजय जाधव, आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स प्रशिक्षक श्री. सुभाष पवार यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी उपस्थित संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्रा. विरेन भिर्डी, इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे, तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी डॉ. शरद बनसोडे म्हणाले, "क्रीडा हा केवळ शारीरिक तंदुरुस्तीचा भाग नसून, तो नेतृत्वगुण, शिस्त, सहकार्य आणि मानसिक सबलता निर्माण करणारा महत्त्वाचा घटक आहे." तसेच, विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात नवनवे उच्चांक प्रस्थापित करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सीईओ श्री. कौस्तुभ गावडे म्हणाले, "खेळ हा केवळ विजयासाठी नसून, मैत्री, शिस्त आणि सहकार्यासाठीही महत्त्वाचा आहे." यानंतर, डॉ. बनसोडे आणि श्री. गावडे यांच्या शुभहस्ते क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ झाला. पहिल्याच सामन्यात खेळाडूंच्या जोशपूर्ण खेळाने संपूर्ण वातावरण क्रीडामय झाले.
याच कार्यक्रमात, शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर मधील माजी विद्यार्थी कृती समितीकडून देण्यात आलेल्या "शिव संस्कार पुरस्कार- २०२५" बद्दल सी.ई.ओ श्री.कौस्तुभ गावडे यांचे इन्स्टिटयूट तर्फे संचालक प्रा. विरेन भिर्डी यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.या क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी इन्स्टिट्यूटचे क्रीडा प्रमुख श्री. ऋषिकेश मेथे-पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
त्याचबरोबर क्रिकेट स्पर्धा समन्वयक प्रा. प्रविण देसाई आणि प्रा. सूरज गायकवाड यांनी खेळाचे उत्कृष्ट आयोजन केले. सामन्यांचे पंच म्हणून श्री. संदीप पाटील आणि श्री. सुभाष कुंभार यांनी काम पहिले. या महोत्सवात टेनीस, बुद्धिबळ (Chess), खो-खो, कबड्डी, बॅडमिंटन, कॅरम यांसारख्या विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या वार्षिक क्रीडा महोत्सवासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ.अभयकुमार साळुंखे आणि सचिवा प्रा. सौ शुभांगी गावडे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अशोक कोळेकर यांनी केले.