SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शनिवारी कोल्हापूर शहरातील सर्व स्ट्रीट लाईट बंद ठेवुन 'अर्थ अवर'कोल्हापूर : घरफाळा दंडामध्ये व पाणी बिलातील विलंब आकारामध्ये 26 ते 31 मार्च अखेर 80 टक्के सवलतकोल्हापूर जिल्ह्यात अफवांमुळे पेट्रोल पंपांवर मागणी व पुरवठा यामध्ये असमतोल निर्माण झाल्याने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत प्रशासनाकडून आवश्यक निर्बंधनिरोगी, सक्षम व बुद्धिमान पिढीसाठी स्तनपान काळाची गरज : जिल्हाधिकारी अमोल येडगेकोल्हापूर विमानतळ विकासासाठी ५० कोटी : पालकमंत्री आबिटकर; विस्तारीकरणाच्या कामास मिळणार गतीकोल्हापूर महापालिका व जलसंपदा वसूलीबाबत सकारात्मक तोडगाहॉटेल व कॅटरिंग व्यावसायिकांचा गॅस पुरवठा पुर्ववत चालू करा; कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे मागणीकोल्हापूर जिल्हा सराफ सुवर्णकार संघाचा २८ मार्च रोजी जिल्हास्तरीय मेळावा; व्यवसायातील आव्हानांवर होणार 'मंथन'डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा 'इंपल्स 2026' संपन्नकणेरी मठात रंगणार १७ राज्यांतील कलाकारांचा 'सिद्धगिरी कारागीर महाकुंभ'; ३१ मार्चपासून महासोहळ्याला सुरुवात

जाहिरात

 

निरोगी, सक्षम व बुद्धिमान पिढीसाठी स्तनपान काळाची गरज : जिल्हाधिकारी अमोल येडगे

schedule25 Mar 26 person by visibility 123 categoryराज्य

◼️'स्तनपान व शिशुपोषण' या विषयावर विशेष अ‍ॅडव्होकेसी बैठक

कोल्हापूर : निरोगी, सक्षम आणि बुद्धिमान पिढी घडवण्यासाठी आईचे स्तनपान अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, शेंडा पार्क, कोल्हापूर येथे २४ मार्च रोजी 'स्तनपान व शिशुपोषण' या विषयावर आयोजित विशेष अ‍ॅडव्होकेसी बैठकीत ते बोलत होते. राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य विभागातील प्रशिक्षणाचे महत्त्व जाणून घेऊन बी.पी.एन.आय. (BPNI) या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. याच अनुषंगाने 'ब्रेस्टफीडिंग प्रमोशन नेटवर्क ऑफ इंडिया' आणि सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती के. मंजुलक्ष्मी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. योगेश साळे यांनी विषयाची प्रस्तावना करताना स्तनपानाचे महत्त्व अधोरेखित केले. समाजात असलेल्या चुकीच्या रूढी-परंपरा व समजुती दूर केल्यास आणि योग्य स्तनपानाची शिफारस केल्यास बालमृत्यू टाळता येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. 

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सशक्त, निरोगी आणि बुद्धिमान पिढी घडवायची असेल तर त्याची सुरुवात जन्माच्या पहिल्या तासापासून होणाऱ्या स्तनपानाने होते. सुदृढ गाव आणि सुदृढ बालक हवे असेल तर स्तनपानाची ही व्यापक चळवळ आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत अखंडित चालू राहिली पाहिजे. यासाठी अंगणवाडी व गाव पातळीवरील वेगवेगळ्या समितींचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे. शासनाच्या 'पोषण अभियान', 'मातृत्व वंदना योजना' आणि आरोग्य विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे स्तनपानाची जनजागृती होत असली तरी, या योजनांचा खरा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घराघरात जाऊन मातांना योग्य मार्गदर्शन करावे आणि गैरसमज दूर करून स्तनपानाचे महत्त्व पटवून द्यावे, जेणेकरून बालमृत्यूचे प्रमाण कमी होईल, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी स्तनपानाचे महत्त्व सांगताना स्पष्ट केले की, केवळ स्तनपानामुळे २० टक्के बालमृत्यू टाळता येतात, त्यामुळे ही चळवळ प्रत्येक घरापर्यंत नेणे आवश्यक आहे. तसेच, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त श्रीमती के. मंजुलक्ष्मी यांनी शासकीय विभागांमध्ये महिलांसाठी 'हिरकणी कक्ष' सक्षम करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. महिलांना सन्मानपूर्वक स्तनपान करण्याकरिता या कक्षांमध्ये सर्व मूलभूत सोयीसुविधांचा अंतर्भाव असावा, असे त्यांनी सुचवले. 

या बैठकीसाठी कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, माता-बाल संगोपन अधिकारी, शहरी व ग्रामीण भागातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, एकात्मिक बालविकास अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञ, अधिसेविका आणि नर्सिंगचे प्राचार्य असे सर्व भागधारक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राच्या वैद्यकीय अधिव्याख्याता डॉ. सौ. सुनीता वाडीकर यांनी केले आणि  उपस्थितांचे आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes