कणेरी मठात रंगणार १७ राज्यांतील कलाकारांचा 'सिद्धगिरी कारागीर महाकुंभ'; ३१ मार्चपासून महासोहळ्याला सुरुवात
schedule25 Mar 26 person by visibility 236 categoryसामाजिक
कोल्हापूर: कोल्हापूरची शान असलेल्या श्री सिद्धगिरी संस्थान मठ, कणेरी आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी ३१ मार्च ते ४ एप्रिल २०२६ या कालावधीत भव्य 'सिद्धगिरी कारागीर महाकुंभा'चे आयोजन करण्यात आले आहे.
पारंपरिक हस्तकला आणि स्थानिक कौशल्यांना जागतिक व्यासपीठ मिळवून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या महाकुंभाचे मुख्य आकर्षण म्हणजे भारतातील तब्बल १७ राज्यांमधून येणारे २०० हून अधिक नामवंत कलाकार. यामध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक प्राप्त कारागीर आपल्या कलेचे प्रत्यक्ष सादरीकरण (Live Demo) करणार आहेत. केवळ प्रदर्शनच नव्हे, तर या कलाकृतींना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने येथे विक्रीची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
या प्रदर्शनात टेराकोटा, मातीची ज्वेलरी, बांबू काम, लेदर वर्क, पिंगुळी चित्रकला, आदिवासी भिल्ल चित्रकला, आणि स्टोन वर्क अशा दुर्मिळ कला पाहायला मिळतील. याशिवाय महाराष्ट्राची पैठण, बंजारा कला, बनारसी जरदोशी साड्या, आणि कच्छमधील रबरी कला अशा वैविध्यपूर्ण वस्तूंची रेलचेल येथे असणार आहे. मक्याच्या कणसापासून तयार केलेल्या वस्तू आणि लाखेच्या बांगड्या हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
तंत्र महाविद्यालय, आय.टी.आय. आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना या महाकुंभासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. पारंपरिक कलांना आधुनिकतेची जोड देऊन छोटे उद्योग कसे सुरू करता येतील, याचा वस्तुपाठ या निमित्ताने तरुणांना मिळणार आहे. कोल्हापूरकरांनी आपल्या मित्र-परिवारासह या सोहळ्याला भेट देऊन कारागिरांच्या कलेचा गौरव करावा, असे आवाहन संस्थानातर्फे करण्यात आले आहे.


