बारावा आंतरराष्ट्रीय योगदिन शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरा, योग साधना ही जीवन पध्दती बनवण्याची गरज : खासदार धनंजय महाडिक
schedule21 Jun 26 person by visibility 131 categoryराज्य
कोल्हापूर : योग साधना ही भारतीयांची प्रमुख जीवन पध्दती बनली आहे. शरीर आजारमुक्त करण्याचा एकमेव उपाय म्हणजे योग साधना असल्याने सर्वांनी जीवनात योग साधनेचा कायमपणे अवलंब करावा, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. शिवाजी विद्यापीठात झालेल्या या योग प्रात्यक्षिक शिबिरात ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जाहीर झालेला आंतरराष्ट्रीय योगदिन आज सर्वत्र उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने शिवाजी विद्यापीठात योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवत, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी निरोगी आणि आरोग्यसंपन्न जीवन जगण्याचा संकल्प केला. ५७५ योग साधकांनी नोंदणी केली होती.
खासदार महाडिक यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कुलगुरू डॉ. आर. के. कामत, प्र कुलगुरू ज्योती जाधव, सुहासिनी पाटील, अजितसिंह जाधव, महादेव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. भारताच्या प्राचीन परंपरेत हजारो वर्षांपासून योगाभ्यास केला जातो. हे आपल्या सर्वांबरोबरच पुढच्या पिढीसाठीही उपयुक्त आहे. शिवाजी विद्यापीठामध्ये १२ वर्षापासून आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहाने साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्राचीन परंपरेला २०१४ पासून आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त करुन देण्याचे मोठे कार्य केले आहे.
जगभरातील सुमारे १३० देशांमध्ये योग दिन साजरा केला जातो. भारतात काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ६० हजार ठिकाणी योग दिन साजरा होतो, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. २०१५ सालापासून गेली १२ वर्षे शिवाजी विद्यापीठात दररोज योग शिबिर घेतले जाते. या उपक्रमाचा दररोज २५० साधक लाभ घेतात, असे कुलगुरु आर. के. कामत यांनी सांगितले. शिबिरात डॉ. महादेव देशमुख, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, डॉ. कबीर खराडे, डॉ. एस. जी. घाणे, डॉ. रामचंद्र पवार, आकाश कोरगावकर, राज कोरगावकर, अझरुद्दीन मुल्ला, परशुराम पाटील यांच्यासह शिक्षक, एनसीसीचे विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते.