३४ जणांवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया; आरोग्य अभियानातील लाभार्थ्यांची संख्या १६ हजार ७०१ वर
schedule20 Nov 26 person by visibility 144 categoryआरोग्य
शिरोळ : ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सहकारमहर्षी स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिरोळ तालुक्यात सुरू असलेल्या मोफत आरोग्य व नेत्र तपासणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बुधवारी गणेशवाडी, गुरुवारी बुबनाळ आणि शुक्रवारी आलास येथे आयोजित आरोग्य शिबिरांमध्ये एकूण ९०५ नागरिकांची आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये ३४ जणांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे अभियानातील आजअखेर लाभार्थ्यांची संख्या १६ हजार ७०१ वर पोहोचली आहे.
आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन आणि शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, यड्राव यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच मोफत आरोग्य व नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध होत असल्याने या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
बुधवारी गणेशवाडी येथे झालेल्या शिबिरात १२३ नागरिकांची आरोग्य तपासणी, तर १५४ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. एकूण २७७ जणांची तपासणी झाली. यामध्ये २२ जणांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
यावेळी प्रशांत अपिने, धनपाल खोत, राजू कुचनुरे, पोपट शिरगावे, पोपट लोंढे, अनिल लोंढे, संदीप कांबळे, सुरेश पांडव, अजहर जमादार, विकी खोत, सुनील गावडे, किरण कांबळे, आप्पासो खोत, सुरेश अंकलखोपे, संभा मोरे, महादेव राजमाने यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
गुरुवारी बुबनाळ येथे झालेल्या शिबिरात ९७ नागरिकांची आरोग्य तपासणी, तर १२० जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये १२ जणांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी सुरेश शहापुरे, विद्यासागर मरजे, नाभिराज मरजे, रंगराव जाधव, अमोल हिंगणगावे, रमेश मांजरे, वासुदेव बाबर, शेखर राजमाने, जंबू मरजे, सुनील किनिंगे, पवन मरजे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
शुक्रवारी आलास येथे झालेल्या शिबिरात १८३ नागरिकांची आरोग्य तपासणी, तर २२८ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्य फजलेअली पाटील, सरपंच सचिन दानोळे, भूपाल बोरगावे, दस्तगीर शेख, संजय मगदूम, राजेंद्र गीताजे, अशोक गीताजे, अण्णासो गीताजे, मल्लाप्पा वैरागे, कांतीनाथ सुतार, अशरफ पाटील यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.