कोल्हापूर महानगरपालिका: प्रभाग समित्यांच्या कामकाजाला मिळणार नवी गतिमानता!
schedule23 Sep 26 person by visibility 114 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित स्थानिक नागरी प्रश्नांचे जलद, प्रभावी व कालबद्ध निराकरण करण्यासाठी आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अंतर्गत, चारही प्रभाग समित्यांचे कामकाज अधिक परिणामकारक बनवण्यासाठी ‘प्रभाग समिती सभा कामकाज नियंत्रण अधिकारी’ नियुक्त करण्यात आले आहेत.
नियुक्त अधिकारी व प्रभाग समिती विभाग
* प्रभाग समिती क्र. १: नागेंद्र मुतकेकर (उपआयुक्त क्र. ३)
* प्रभाग समिती क्र. २: किरणकुमार धनवाडे (उपआयुक्त क्र. २)
* प्रभाग समिती क्र. ३: परितोष कंकाळ (उपआयुक्त क्र. १)
* प्रभाग समिती क्र. ४: रविकांत आडसुळ (अतिरिक्त आयुक्त क्र. १)
▪️प्रमुख जबाबदाऱ्या व कार्यपद्धती
* सभेस अनिवार्य उपस्थिती: नियंत्रण अधिकाऱ्यांनी प्रत्येक प्रभाग समिती सभेस स्वतः उपस्थित राहून सदस्यांच्या सूचना व तक्रारींची गांभीर्याने नोंद घेणे बंधनकारक आहे.
* कालबद्ध कारवाई: तातडीच्या बाबींवर २४ तासांत किंवा तत्काळ, तर सामान्य स्वरूपाच्या बाबींवर १५ दिवसांच्या आत कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश विभागप्रमुखांना देण्यात आले आहेत.
* नियमित पाठपुरावा: प्रत्येक प्रश्नासाठी जबाबदार अधिकारी आणि निश्चित कालमर्यादा सभेच्या इतिवृत्तात नमूद केली जाईल. तसेच, प्रलंबित कामांचा पुढील सभेत आढावा घेतला जाईल.
* ॲक्शन टेकन रिपोर्ट: प्रत्येक बैठकीतील प्रश्नांवर झालेली कारवाई नोंदवून त्याचा प्रमाणित अहवाल आयुक्तांकडे सादर केला जाईल.
▪️या समस्यांवर राहणार विशेष लक्ष
या व्यवस्थेमुळे पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, रस्ते, पथदिवे, अतिक्रमण, आरोग्य, पावसाळापूर्व कामे तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या सुविधांसारखे प्रश्न थेट प्रभागाच्या स्तरावरच मार्गी लागणार आहेत. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे नागरिकांच्या तक्रारींना जलद न्याय मिळण्यासोबतच महानगरपालिकेच्या वेळेची बचत होऊन विकासात्मक कामांना गती मिळणार आहे.
◼️थोडक्यात काय तर: स्थानिक पातळीवरील समस्या आता कागदावर न राहता, वेळेत आणि थेट प्रभागातच सुटणार असल्याने कोल्हापूरकरांच्या नागरी जीवनाला मोठा दिलासा मिळणार आहे.