कोल्हापुरात ज्वेलर्स दुकान फोडणारा चोरटा गजाआड!
schedule03 Jun 26 person by visibility 123 categoryगुन्हे
◼️स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई: ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका ज्वेलर्सचे दुकान फोडणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ४,१५,८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिनांक ३० मे ते ३१ मे २०२६ च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी उजळाईवाडी (ता. करवीर) येथील प्रविण रूपाराम माळी यांच्या ज्वेलर्स दुकानाचे शटरचे कुलूप कापून व उचकटून चांदीचे दागिने, मूर्ती आणि इमिटेशन ज्वेलरी चोरून नेली होती. याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला. पोलीस अंमलदार रोहीत मर्दाने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, संशयित आरोपी आकाश सगन राठोड (वय २०, रा. शिरोली पुलाची) याला शिये फाटा येथून ताब्यात घेण्यात आले.
आरोपीच्या ताब्यातून चांदीचे दागिने, चांदीची गणपती मूर्ती, सोन्याची चैन, ब्रेसलेट, मंगळसूत्र आणि चोरीसाठी वापरलेले ग्रायंडर मशिन व अल्टो कार (क्र. एम.एच. १२ डीवाय ८२५३) असा एकूण ४,१५,८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. चौकशीदरम्यान त्याने आपला साथीदार आदिनाथ संजय नरसिंगे याच्यासह हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.