समाजातील शेवटच्या घटकाचं हक्क आणि अधिकार अबाधित राखण्याचं काम संविधानाने केले : शीतल धनवडे
schedule26 Nov 25 person by visibility 77 categoryसामाजिक
कोल्हापूर : समाजातील शेवटच्या घटकाचं हक्क आणि अधिकार अबाधित राखण्याचं काम भारतीय संविधानानं केलं आहे,कोणी संविधानाची पायमल्ली करत असेल तर संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या सर्वांची असून प्रत्येकानं भारतीय संविधान समजून घेऊन वाटचाल करावी असे प्रतिपादन कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी केले. भारतीय संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कोल्हापुर जिल्ह्यातील तृतीयपंथी समुदायांसाठी काम करणारी मैत्री संघटन, निराधारांसाठी कार्यरत एकटी तसेच एच.आय.व्ही. ग्रस्तांसाठी कार्यथत जाणीव या सामाजिक संस्था आणि कोल्हापुरातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या कोल्हापूर प्रेस क्लब, कोल्हापूर च्या संयुक्त विद्यमान आज संविधान दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर मैत्री संघटनेच्या शिवानी गजबर यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करुन,प्रत्येक शब्दाचे महत्त्व विषद केले. संविधानामुळेच तृतीयपंथीयांना समाजात आत्मसन्मान तसेच हक्क मिळू लागल्याने, समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आम्हाला बळ मिळत असल्याचे सांगितले.
वेळी बोलताना कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे म्हणाले,आज भारतीय संविधानाच्या रक्षणाची सामूहिक जबाबदारी आपणा सर्वांची आहे,भारतीय राज्यघटना छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांवर आधारित आहे. राजकीय पक्षांकडून एकीकडे संविधानाची पायमल्ली सुरू असल्याचे चित्र दिसत असताना जगातील सर्वोत्कृष्ट भारतीय संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी आपली असल्याचे मत यावेळी अध्यक्ष शीतल धनवडे यांनी व्यक्त केले. जाणीव संघटनेच्या सुषमा बटकडली यांनीही वंचित घटकांना संविधानाचा आधार किती महत्त्वाचा आहे हे विषद केले.
कार्यक्रमात पत्रकार महेश कांबळे, श्रद्धा जोगळेकर, दयानंद जीरगे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला उपस्थितांना संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाटप करण्यात आलं.यावेळी रघुनाथ पाटील, अजित साळुंखे, जावेद शेख यांच्यासह एमएसडब्लुच्या विद्यार्थीनीं उपस्थित होते, कार्यक्रमाचे आभार एकटी संस्थेच्या व्यवस्थापिका सुरेखा कांबळे यांनी मानले.