कोल्हापूर : हुबळीहुन मिरज मार्गे पुण्याला जाणारी वंदे भारत रेल्वे, आता कोल्हापूर मार्गे पुण्याला जाईल. सुरुवातीला आठवड्यातील तीन दिवस, हुबळीहून आलेली वंदे भारत एक्सप्रेस, कोल्हापुरातून प्रवासी घेऊन पुण्यापर्यंत धावेल. मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाचे अद्याप दुहेरीकरण झाले नसल्याने वंदे भारतसह, नवीन गाड्या सुरू होण्यास अडथळा निर्माण होत आहे. पण हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापूर मार्गे जाणार, ही आश्वासक सुरुवात आहे. लवकरच कोल्हापूर-मुंबई या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची आशा आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
केंद्रातील मोदी सरकारनं पायाभूत सुविधांच्या विकासाकडं लक्ष दिलंय. संपूर्ण भारतीय बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस, अल्पावधीत अत्यंत लोकप्रिय झाली आहे. वेगवान आणि आरामदायी अशी वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांची गर्दी खेचत आहे. कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू व्हावी, अशी कोल्हापूरकरांची इच्छा आहे. खासदार धनंजय महाडिक सातत्यानं कोल्हापुरातून वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दरम्यान आठवड्यातून तीन दिवस हुबळी ते पुणे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावेल, असे नुकतेच जाहीर झाले. त्यानंतर खासदार महाडिक यांनी, हुबळीहून मिरज मार्गे पुण्याला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापूर पर्यंत यावी, यासाठी पाठपुरावा केला. त्याला यश आलं असून, आता हुबळी ते पुणे मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापुरात येणार आहे.
परिणामी कोल्हापूर ते पुणे हे अंतर, आरामदायी वंदे भारत एक्सप्रेस मधून अवघ्या पाच तासात गाठता येणार आहे. आठवड्यातून तीनदा हुबळीहून पुण्याला आणि पुण्याहून हुबळीला धावणारी वंदे भारत एक्सप्रेस, प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापुरात येईल. कोल्हापुरातून प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला, तर भविष्यात कायमस्वरूपी ही ट्रेन याच मार्गावर धावेल, अशी आशा आहे. मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाचे अजुन दुहेरीकरण झालेलं नसल्याने वंदे भारत सह नव्या एक्सप्रेस गाड्या सुरू करण्यात अडचणी आहेत. हुबळी ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस, कोल्हापूर मार्गे जाणार असल्यानं लवकरच कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू होईल, या आशेला बळकटी मिळाली आहे.
सकाळी सव्वा दहा वाजता कोल्हापुरात येणारी वंदे भारत एक्सप्रेस, साडेदहा वाजता पुण्याच्या दिशेने रवाना होईल आणि दुपारी साडेतीन वाजता पुण्यात पोहोचेल. तर पुण्यातून सायंकाळी निघणारी वंदे भारत एक्सप्रेस, अवघ्या पाच तासात कोल्हापुरात येईल. त्यामुळं हजारो प्रवाशांना आरामदायी आणि वेगवान रेल्वे प्रवास करता येणार आहे.