कोल्हापूर : कपडे आणायला गेलेल्या पत्नीचा निर्घृण खून; नराधम पतीने १० वर्षांचा संसार संपवला!
schedule16 Aug 26 person by visibility 231 categoryगुन्हे
◼️माहेरच्या आश्रयाला गेलेल्या पत्नीचा काटा काढला; १० वर्षांच्या संसाराचा रक्तरंजित अंत
पाचगाव: अवघ्या १० वर्षांपूर्वी प्रेमाचा आणि विश्वासाचा धागा धरून सुरू झालेला संसार रक्ताने लाल झाला आहे. पाचगावच्या योगेश्वरी कॉलनीमध्ये रविवारी (दि. १६) सकाळी दहाच्या सुमारास एका नराधम पतीने घरगुती वादातून आपल्याच पत्नीचा निर्घृण खून केल्याची थरारक घटना घडली. गणेश कदम असे या मारेकरी पतीचे नाव असून, दिपाली कदम असे मृत पत्नीचे नाव आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण पाचगाव परिसर हादरून गेला आहे.
दिपाली आणि गणेश यांचा विवाह दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्या संसारात किरकोळ कारणांवरून सातत्याने खटके उडत होते. सततच्या भांडणांना कंटाळून अवघ्या आठ दिवसांपूर्वीच दिपाली पतीचे घर सोडत शेजारीच असलेल्या आपल्या माहेरी राहायला निघून गेली होती.
रविवारी सकाळी दिपाली काही कामानिमित्त आणि कपडे घेण्यासाठी गणेशच्या घरी आली होती. पण, तिथे पाऊल ठेवताच दोघांमध्ये पुन्हा एकदा जुना वाद उफाळून आला. वादाचे पर्यवसान अखेर हाणामारीत झाले. याच रागाच्या भडक्यात संतापाने बेभान झालेल्या गणेशने दिपालीवर जीवघेणा हल्ला केला. या नृशंस हल्ल्यात गंभीर जखमी झालेली दिपाली जागीच कोलमडली आणि तिचा जागीच प्राण गेला.
घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच करवीर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तत्काळ पंचनामा सुरू केला असून, या खुनामागच्या प्रत्येक धाग्या-दोऱ्याचा कसून शोध घेतला जात आहे.