'गोकुळ' दूध दरात लवकरच वाढ होणार? बुधवार-गुरुवारपर्यंत निर्णय शक्यता; नवे अध्यक्ष राजेश पाटील यांची माहिती
schedule14 Nov 26 person by visibility 167 categoryउद्योग
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच लोकप्रिय 'गोकुळ' ब्रँडच्या दूध दरवाढीबाबत लवकरच ग्राहकांना आणि दूध उत्पादकांना दिलासादायक निर्णय शक्यता आहे. गोकुळच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली सभा नुकतीच अध्यक्ष राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले.
◼️बैठकीतील प्रमुख मुद्दे:
* बुधवार-गुरुवारपर्यंत दूध दरवाढीचा निर्णय: अमूल आणि मदर डेअरीने मुंबई बाजारात दूध दर वाढवले आहेत. याच पार्श्वभूमीवर गोकुळच्या दुधाच्या दरवाढीबाबतही मुंबईतील वितरकांशी चर्चा करून, तसेच सर्व संचालकांना विश्वासात घेऊन बुधवार किंवा गुरुवारपर्यंत अंतिम व सकारात्मक निर्णय जाहीर केला जाईल, असे अध्यक्ष राजेश पाटील यांनी स्पष्ट केले. गोकुळच्या दर्जेदार उत्पादनांमुळे दर वाढले तरी विक्रीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
* प्रशासकीय काळातील २४ कोटींच्या तोट्यावर चर्चा: मागील सहा महिन्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत झालेल्या सुमारे २४ कोटी रुपयांच्या तोट्याची कारणमीमांसा करण्यासाठी आगामी आठवड्यात स्वतंत्र बैठक बोलावण्यात आली आहे. पशुखाद्य, कच्च्या मालाचा (रॉ मटेरियल) खर्च आणि डिझेलचे वाढलेले दर यांसारख्या विविध बाबींवर चर्चा करून हा तोटा ३१ मार्चपर्यंत कसा भरून काढायचा आणि संघाचा सुमारे १३० कोटी रुपयांचा नफा कसा टिकवायचा, याचे नियोजन केले जात आहे.
* सर्वसमावेशक आणि पारदर्शक कारभार: बैठकीत सर्व २५ निर्वाचित आणि ४ शासन नियुक्त संचालक उपस्थित होते. निवडणुकीतील आघाड्यांचे राजकारण बाजूला ठेवून, दूध उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांच्या हिताचे सर्व निर्णय सर्वसंमतीने व पारदर्शक पद्धतीने घेतले जातील, अशी ग्वाही यावेळी अध्यक्षांनी दिली.