कोल्हापूर महापालिकेच्या १४६ कर्मचाऱ्यांची १५ कोटी ५ लाखांची रक्कम राष्ट्रीय निवृत्ती योजनेकडे वर्ग
schedule13 Oct 26 person by visibility 127 categoryमहानगरपालिका
◼️आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार कार्यवाही; दरमहा कपात होणारी रक्कमही राष्ट्रीय निवृत्ती योजनेकडे वर्ग करणार
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS) अंतर्गत पहिल्या टप्प्यात विकल्प दिलेल्या १४६ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंशदायी भविष्य निर्वाह निधी (CPF) या खात्यात जमा असलेली डिसेंबर २०२५ अखेरची रु.१५ कोटी ५ लाख २ हजार ४२२ रुपयांची रक्कम राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेकडे वर्ग करण्यात आली आहे.
यापुढेही संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा कपात होणारी रक्कम राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत वर्ग करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले होते. त्यानुसार महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात विकल्प स्वीकारलेल्या १४६ कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कर्मचारी हिस्सा म्हणून १० टक्के रक्कम कपात केली जाते. तसेच महापालिकेचा नियुक्त अनुदान हिस्सा म्हणून १४ टक्के रक्कम जमा केली जाते. या दोन्ही रक्कमा यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांच्या अंशदायी भविष्य निर्वाह निधी (CPF) खात्यावर जमा होत होत्या. आता डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत जमा झालेली एकूण रक्कम राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS) योजनेकडे वर्ग करण्यात आली आहे.
दरम्यान, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या पोर्टलवर कर्मचाऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, दररोज आठ ते दहा कर्मचाऱ्यांचे अर्ज भरले जात आहेत. ज्या कर्मचाऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरणे अद्याप बाकी आहे, त्यांनी महापालिकेच्या प्रॉव्हिडंट फंड/पेन्शन विभागातील कनिष्ठ लिपिकांशी संपर्क साधावा असे आवाहन प्रॉ.फंड विभागाकडून करण्यात आले आहे.
आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर व सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॉव्हिडंट फंड/पेन्शन विभागाचे अधीक्षक मकरंद जोशी, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, प्राथमिक शिक्षण मंडळाकडील शिक्षक किरण पाडळकर तसेच मोनार्च सिस्टीमच्या कर्मचाऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. यापुढेही प्रत्येक महिन्यात कपात होणारी रक्कम नियमितपणे राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) योजनेत वर्ग करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.