धबधब्यात पोहताना १७ वर्षीय युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू; चंदगड परिसरात हळहळ
schedule10 Aug 26 person by visibility 112 categoryराज्य
चंदगड : भुदरगड तालुक्यातील निवडे-खेडगे परिसरातील मंडपीकडा धबधब्यावर पोहताना मोहम्मद युसूफ शेख (वय १७, रा. तांबुळवाडी, ता. चंदगड) या तरूणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
मोहम्मद युसूफ आपल्या कुटुंबातील १३ जणांसोबत निवडे परिसरातील धबधबे पाहण्यासाठी आले होते. सायंकाळी साडेतीन ते चारच्या सुमारास हे कुटुंब सातव्या मंडपी धबधब्याजवळ पोहोचले. यावेळी काही जण पाण्यात पोहत होते. मोहम्मदही पोहण्यासाठी पाण्यात उतरला, मात्र पाण्याच्या खोलीचा नेमका अंदाज न आल्याने तो बुडाला. उपस्थित नातेवाईकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु धबधब्याचे खोल पाणी आणि पाण्याचा मोठा वेग यामुळे त्यांना यश आले नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही तो मिळून आला नाही. अखेर सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवली असता, पोलिसांना मोहम्मदचा मृतदेह शोधण्यात यश आले. या दुर्दैवी घटनेमुळे तांबुळवाडी गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई-वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे.