SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कर्करोग प्रतिबंधासाठी जनजागृती गरजेची : सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरबारावी आणि दहावीच्या परीक्षांदरम्यान कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे मुख्य सचिवांचे आवाहनडॉ. संजय डी. पाटील यांचा राज्यपालांच्या हस्ते 'सी.एस.आर हिरो' पुरस्काराने गौरव; नवभारत ग्रुपकडून शैक्षणिक कार्याचा सन्मानमुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सामान्य मुंबईकरांना दिलासा देणारा; ग्लोबल मुंबईचा शुभारंभ : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमोटर सायकल चोरणाऱ्या एक आरोपी अटक, दोन बालके ताब्यात. दोन बुलेट, दोन स्प्लेंडर मोटर सायकल जप्त विद्यार्थ्यांनो आपल्या ध्येयाबरोबर पालकांची स्वप्नेही पूर्ण करा : जिल्हाधिकारी अमोल येडगे; इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांशी साधला संवादराष्ट्रीय युवा संसद स्पर्धेसाठी डॉ. प्रल्हाद माने समूह समन्वयकविदेशी कला, संस्कृतीला समर्पित ‘कार्निव्हल-२०२५’चे उद्या आयोज अवैध दारू विरोधी कारवाईत मृत्यू पावलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागामधील जवानाच्या वारसांना साडेसात लाख नुकसान भरपाई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहितीसमाज कल्याण विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी 15 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करावेत

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठाकडून विज्ञानजगताला नवा सिद्धांत आणि समीकरणाची देणगी; प्रा. ज्योती जाधव, शुभम सुतार यांनी मांडली ‘थिअरी ऑफ पोअर कॉन्फ्लेशन’ आणि ‘शुभज्योत समीकरण’

schedule23 Jan 25 person by visibility 303 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया आणि शुद्धीकरण या जगाला भेडसावणाऱ्या समस्येच्या अनुषंगाने संशोधन करीत असताना शिवाजी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान अधिविभागातील संशोधकांनी जागतिक अॅडसॉर्पशन विज्ञानाच्या क्षेत्राला ‘थिअरी ऑफ पोअर कॉन्फ्लेशन’ या नव्या सिद्धांताची तसेच ‘शुभज्योत इक्वेशन’ या नव्या समीकरणाची देणगी दिली आहे.

जागतिक आघाडीच्या २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये समाविष्ट असलेल्या ज्येष्ठ संशोधक डॉ. ज्योती जाधव आणि त्यांचे संशोधक विद्यार्थी शुभम सुतार यांनी हे संशोधन केले आहे. ‘स्प्रिंजर नेचर’च्या प्रतिष्ठित ‘बायोचार’ या शोधपत्रिकेमध्ये नुकताच त्यांचा ‘‘थिअरी ऑफ पोअर कॉन्फ्लेशन’ अँड ‘शुभज्योत इक्वेशन’ इन दि ट्रिटमेंट ऑफ ब्रिलियंट ग्रीन डाय-कॉन्टॅमिनेटेड वॉटर युजिंग जामून लिव्ह्ज बायोचार’ हा तब्बल २८ पृष्ठांचा शोधनिबंध प्रकाशित झाला असून वैज्ञानिक जगताकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान अधिविभागात गेल्या वीस वर्षांपासून औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया, शुद्धीकरण आणि त्याचे व्यवस्थापन या विषयाच्या अनुषंगाने सातत्याने संशोधन सुरू आहे. विशेषतः वस्त्रोद्योग कारखान्यांमधून जी प्रदूषक रंगद्रव्ये सांडपाण्यात मिसळलेली असतात. त्यांच्यावर प्रक्रिया करून ते सांडपाणी नैसर्गिक पद्धतीने शुद्ध करण्याच्या दिशेने प्रा. ज्योती जाधव यांचे संशोधन केंद्रित आहे. निसर्गातील विविध सेंद्रिय घटकांचा वापर करून ‘बायोचार’ हा सांडपाण्यातून रंग-प्रदूषके शोषून घेणारा स्पंजसारखा सच्छिद्र पदार्थ निर्माण करणे आणि त्याची शोषण क्षमता वाढवित जाऊन संबंधित सांडपाण्याचे जास्तीत जास्त शुद्धीकरण करणे, अशी या संशोधनाची दिशा आहे.

प्रा. ज्योती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शुभम सुतार या संशोधक विद्यार्थ्याने जांभळाच्या पानांपासून बायोचार तयार केला. पण या निर्मितीपुरतेच मर्यादित न राहता बायोचारच्या शोषण (अॅडसॉर्पशन) क्षमतेमधील वृद्धीचे विश्लेषण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यातून ‘पोअर कॉन्फ्लेशनचा सिद्धांत’ साकारला. हा सिद्धांत तापमानाच्या अनुषंगाने बायोचारच्या शोषणक्षमता वृद्धीचे स्पष्टीकरण देतो. वैज्ञानिक जगतात प्रथमच अशा स्वरुपाची मांडणी झालेली आहे. उच्च तापमानात बायोचारची शोषणक्षमता कशी वाढते, हे संशोधकांनी यात स्पष्ट केले आहे. तापमानवाढीमुळे बायोचारमध्ये संरचनात्मक बदल होतात. त्याचा पृष्ठभाग आणि अंतर्गत क्षेत्र वाढते. यामुळे अंतिमतः त्याची सच्छिद्रता वाढून त्याच्या शोषण क्षमतेतही वाढ होते, असे हा सिद्धांत सांगतो. या सिद्धांतामुळे अॅडसॉर्पशन विज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांना पुढील संशोधन अधिक गतिमान होण्यासाठी मदत होणार आहे. संशोधकांना या सिद्धांताचा वापर मुख्यतः सर्व प्रकारच्या पाणी शुद्धीकरण करणारे रिअॅक्टर तयार करताना त्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी होणार आहे.

बायोचारच्या शोषण क्षमतावाढीचे मापन सलगपणे करता यावे, यासाठी शुभम यांचा, त्यांच्या सिद्धांताला गणितीय स्वरुप देण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला असून त्यांनी या गुरूशिष्य जोडीच्याच नावाने ‘शुभज्योत समीकरणा’चीही देणगी अॅडसॉर्पशन विज्ञान क्षेत्राला दिली आहे. या क्षेत्रात या पूर्वी स्युडो फर्स्ट ऑर्डर आणि स्युडो सेकंड ऑर्डर रिअॅक्शन मॉडेल्स प्रचलित आहेत. ही मॉडेल्स बायोचारच्या शोषणक्षमतेचे मापन करीत असताना लागणाऱ्या वेळेचा विचार करीत नाहीत. नेमकी ही मर्यादा लक्षात घेऊन शुभम यांनी त्यामध्ये ‘ट्रान्झिएन्ट अॅडसॉर्पशन कपॅसिटी’ या संकल्पनेचा नव्याने समावेश केला आणि त्यावर आधारित शुभज्योत समीकरण मांडले. यामुळे बायोचारच्या शोषण क्षमतेमध्ये क्षणाक्षणाला काय परिवर्तन होते, ती संपृक्ततेच्या बिंदूपर्यंत (इक्विलिब्रियम) कशी बदलत जाते, या सर्वच गोष्टींचे स्पष्टीकरण हे समीकरण करते. यापूर्वी संशोधन क्षेत्राला बायोचारच्या शोषण क्षमतेसंदर्भात माहिती होती; मात्र, शुभज्योत समीकरणामुळे आता त्याची क्षमता संपृक्तबिंदूपर्यंत कमी होत जाते, हेही नव्याने सामोरे आले आहे. अॅडसॉर्पशन विज्ञान क्षेत्रातील संशोधकांना त्यांच्या संशोधनातील डेटा विश्लेषणासाठी या समीकरणाचा फार मोठा उपयोग होणार आहे.

▪️‘यशाचे श्रेय शिवाजी विद्यापीठाचे’
औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया व शुद्धीकरण क्षेत्रात गेली वीस वर्षे सातत्याने संशोधन करीत असलेल्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ज्योती जाधव यांनी या संशोधनाचे संपूर्ण श्रेय हे शिवाजी विद्यापीठाचे असल्याचे सांगितले. या संशोधनाची सारी विश्लेषण प्रक्रिया ही शिवाजी विद्यापीठाच्याच जैवतंत्रज्ञान अधिविभागासह विविध अधिविभाग आणि मध्यवर्ती सुविधा केंद्र (सी.एफ.सी.) येथे उपलब्ध शास्त्रीय उपकरणांवर करण्यात आली आहे. त्यासाठी कोठेही बाहेर जाण्याची गरज भासली नाही. विद्यापीठाने उपलब्ध केलेली ही सामग्री आणि कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह सर्वच प्रशासकीय घटकांचे पाठबळ या आधारावरच संशोधनाच्या क्षेत्रात इतकी मोठी झेप घेता आली, असे त्यांनी सांगितले.

▪️‘मार्गदर्शकाचा विश्वास सार्थ, त्याला ‘महाज्योती’ची साथ’
संशोधक विद्यार्थी शुभम सुतार यांनी सांगितले की, हे संशोधन करीत असताना कित्येकदा त्याविषयी साशंकता वाटायची. मात्र मार्गदर्शक प्रा. जाधव यांनी मात्र संशोधन पुढे घेऊन जाण्यास सातत्याने प्रोत्साहित केले. त्यामुळेच सिद्धांत आणि समीकरण एकाच वेळी मांडता आले, याचे समाधान वाटते. यामध्ये मार्गदर्शकांची मोलाची भूमिका आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या ‘महाज्योती’ शिष्यवृत्तीमुळे मला हे संशोधन करता आले, हेही त्यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले.

▪️महत्त्व ओळखून शोधनिबंध विनाशुल्क प्रकाशित
‘स्प्रिंजर नेचर’ हा जगातील एक आघाडीचा नामांकित शोधपत्रिका समूह आहे. ‘बायोचार’ ही त्यांची अॅडसॉर्पशन विज्ञानाला वाहिलेली विशिष्ट शोधपत्रिका असून तिचा इम्पॅक्ट फॅक्टर १३.१ इतका आहे. गेल्या पाच वर्षांतला इम्पॅक्ट फॅक्टर १४.४ इतका उच्च आहे. एखादा शोधनिबंध येथे प्रकाशित करावयाचा, तर काही लाख रुपयांचे शुल्क रितसर भरावे लागत असते. तथापि, प्रा. जाधव आणि सुतार यांच्या संशोधनाचे महत्त्व ओळखून या शोधपत्रिकेने हा शोधनिबंध विनाशुल्क प्रकाशित केला आहे. दि. १३ जानेवारी २०२५ रोजी प्रकाशित झालेल्या ‘बायोचार’च्या सातव्या खंडात या शोधनिबंधाचा समावेश करण्यात आला असून जगभरातील शास्त्रज्ञांना तो वाचण्यास खुला आहे. ‘हा शोधनिबंध प्रकाशित करीत असताना आम्हाला अतिशय अभिमान वाटत आहे,’ अशी प्रतिक्रिया ‘बायोचार’च्या संपादक मंडळाने व्यक्त केली आहे.

▪️संशोधकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित: कुलगुरू डॉ. शिर्के
शिवाजी विद्यापीठाचे भौगोलिक स्थान कोठेही असले तरी संशोधनाच्या क्षेत्रात ते जागतिक स्तरावर सातत्याने मान्यताप्राप्तच राहिलेले आहे. जागतिक आघाडीच्या २ टक्के संशोधकांमध्ये समावेश असलेल्या प्रा. ज्योती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शुभम सुतार यांनी मांडलेला नवा सिद्धांत आणि समीकरण हे या संशोधकांनी चालविलेल्या सातत्यपूर्ण संशोधनाचे फलित आहे. एखादा सिद्धांत किंवा समीकरण मांडणे आणि त्याचे जागतिक विज्ञान क्षेत्राकडून स्वागत होणे, या अत्यंत दुर्मिळ घटना असतात. त्यामध्ये या संशोधकांनी आता स्थान मिळविले आहे, याचा विद्यापीठ परिवाराला सार्थ अभिमान आहे. ही बाब विद्यापीठातील सर्वच संशोधक, विद्यार्थी यांच्यासाठी प्रेरणादायी आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes