डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात वाचन प्रेरणा दिन
schedule15 Oct 25 person by visibility 71 categoryसामाजिक

कोल्हापूर : भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात आज वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या वतीने राजर्षी शाहू सभागृहात प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विशेष वाचन उपक्रम आयोजित केला. यावेळी भारतीय संविधानाची उद्देशिका आणि मूलभूत अधिकार व कर्तव्ये या विभागातील कलमांचे सामूहिक मूकवाचन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्ञानस्रोत केंद्र संचालक डॉ. धनंजय सुतार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी आभार मानले. विद्यापीठाच्या विविध अधिविभागांतही शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी संविधान उद्देशिकेसह मूलभूत अधिकारांचे वाचन करून उपक्रमात सहभाग दर्शविला.
तत्पूर्वी, डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुख्य प्रशासकीय भवन इमारतीमध्ये त्यांच्या प्रतिमेस कुलसचिव डॉ. शिंदे यांच्या हस्ते पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. सुतार, डॉ. चौगुले, डॉ. मच्छिंद्र गोफणे, डॉ. किशोर कुच्चे, डॉ. ज्योती खराडे, डॉ. जयकुमार भोसले, डॉ. श्रद्धा खराडे, डॉ. एस.आर. यन्कंची, डॉ. सुनील गायकवाड, डॉ. माधव भिलावे, डॉ. किरण कुमार शर्मा, उपकुलसचिव गजानन पळसे यांच्यासह गणित अधिविभागातील शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.