डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या १० विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती; महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार; ४० ते ९५ लाखांची शिष्यवृत्ती
schedule10 Nov 25 person by visibility 189 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : कसबा बावडा येथील डी.वाय. पाटील स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १० विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आहे. प्रत्येकी 40 ते 95 लाख किंमतीच्या ही प्रतिष्ठित शिष्यवृत्ती व फेलोशिप मिळवणाऱ्या १० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या विद्यार्थ्यांनी युनायटेड किंगडम आणि ऑस्ट्रेलिया येथील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवला आहे. यामध्ये किरण कांबळे याला 95 लाख (युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न), गौरव जाधव याला 92 लाख (युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी), सिद्धांत बुचडे याला 92 लाख (युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी), तेजस्विनी गवळी हिला 91 लाख (युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी), वरद पवार याला 80 लाख (युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँड), श्रेय्या देसाई हिला 75 लाख (युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी), श्रुतिका पाटील हिला 75 लाख (ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी) तर पार्थ पाटील याला ४० लाख (युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहम-युनायटेड किंगडम) शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्याचबरोबर शिवानी यादव हिला 90 लाखांची (युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न) तर विकिराज माने याला 85 लाखाची(युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी सिडनी) फेलोशिप मिळाली आहे.
परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती व फेलोशिप मिळवणाऱ्या या विद्यार्थ्याचा सत्कार डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापिठाचे कुलगुरू व डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी जागतिक स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे. परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये मिळालेली शिष्यवृत्ती हि त्यांच्या अथक परिश्रमांची पावती आहेच त्याचबरोबर आमच्या संस्थेच्या शैक्षणिक दर्जाचेही ते प्रतीक आहेत. जगभरातील नव्या तंत्रज्ञान व संशोधन संधींचा लाभ घेऊन हे विद्यार्थी संस्थेचे व देशाचे नाव उज्ज्वल करतील याची खात्री आहे.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, आंतरराष्ट्रीय संबंध विभाग प्रमुख डॉ. सनी मोहिते, आंतरराष्ट्रीय संबंध विभाग सदस्य प्रा. गौरी म्हेतर, डॉ. कीर्ती महाजन, प्रा. तिलोत्तमा पाडळे आणि प्रा. शमिम भाई आदी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना श्री महालक्ष्मी अकॅडमीचे अभय केळकर यांचे मार्गदर्शन लाभले.
शिष्यवृत्ती व फेलोशिप मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी अभिनंदन केले.