डी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार : डॉ. संजय डी. पाटील; विद्यापीठाचा पाचवा स्थापना दिवस उत्साहात साजरा
schedule01 Jul 25 person by visibility 157 categoryशैक्षणिक

तळसंदे : तळसंदे सारख्या ग्रामीण भागात स्थापन झालेल्या डी. वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाने गेल्या चार वर्षांत शिक्षण पद्धती, संशोधन, प्लेसमेंट या सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी करत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून शेती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात ठोस योगदान देण्याचे कार्य अधिक ताकदीने सुरु राहील. या विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया असे आवाहन कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी केले. विद्यापीठाच्या पाचव्या स्थापना दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व गजानन महाराजांच्या पूजनाने करण्यात आली. यानंतर केक कापून चौथा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, सौ पूजा ऋतुराज पाटील, देवश्री सतेज पाटील, कुलगुरू डॉ. के. प्रथापन, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, कुलसचिव डॉ. जे. ए. खोत, तळसंदे कॅम्पस संचालक डॉ. एस. बी. पाटील आदी उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाले, या विद्यापीठात राज्याबाहेरीलही अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून अत्याधुनिक सुविधावर भर दिला जात आहे. विद्यापीठात नवनवे अभ्यासक्रम, तंत्रज्ञान, सोयी सुविधा देऊन उत्तम दर्जाचे विद्यार्थी घडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. येत्या पाच वर्षात येथील विद्यार्थी संख्या १० हजार पर्यंत पोहचावी असे उद्दिष्ट ठेवले आहे.
विश्वस्त ऋतुराज पाटील म्हणाले, विद्यापीठाच्या प्रगतीमध्ये सर्व सहकारी व कर्मचारी यांचे मोठे योगदान आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि ग्रुमिंग या तीन गोष्टीवर भर देऊन उत्तम विद्यार्थी घडवण्यावर आमचा भर आहे. अभ्यासक्रमामध्ये एआयचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्यावर फोकस राहील. येत्या काळात जगातील विविध प्लॅटफॉर्मवर या विद्यापीठाचे जास्तीत जास्त विद्यार्थी दिसतील यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करुया. विद्यापीठचा नावलौकिक अधिक उंचीवर नेण्यासाठी सर्व सहकारी प्रयत्न करतील याची खात्री आहे.
कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद आणि नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमांमुळे विद्यापीठाची लोकप्रियता राज्यभर पसरली आहे. हे विद्यापीठ ग्रेट एजुकेशन हब बनविण्यासाठी सर्वजण प्रयत्न करूया.
कुलगुरू डॉ. के. प्रथापन म्हणाले, इंटर्नशिपच्या माध्यमातून विद्यार्थी उद्योगजगतात तयार होतील. त्यासाठी सर्व अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना एक वर्ष इंटर्नशिप सक्तीची करण्यात आली आहे. विदेशातील अनेक कंपन्यांशी सामंजस्य करण्यात आले आहेत.
कुलसचिव डॉ. खोत यांनी प्रास्तविकामध्ये विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर सक्षम बनवण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांना काळाच्या गरजेनुसार शिक्षण देण्यासाठी विविध अभ्यासक्रम सुरु करण्यात आल्याचे त्यानी सांगितले.
यावेळी सीएचआरओ श्रीलेखा साटम, विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. गुरुनाथ मोटे, वित्त अधिकारी सुजित सरनाईक, उपकुलसचिव डॉ. उत्कर्ष आवळेकर, अधिष्ठाता डॉ. संग्राम पाटील, डॉ. मुरली मनोहर बी, डॉ. राजेंद्र नेर्ली, डॉ. वैशाली गायकवाड यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य, प्रमुख, विभागप्रमुख,प्राध्यापक, व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. शुभदा यादव व प्रा. शिवानी जंगम यांनी केले, तर अधिष्ठाता डॉ. शिवानंद शिरकोळे यांनी आभार मानले.