वारणा उद्योग समूहाकडून शेतकरी, कामगारांची दिवाळी गोड; दिवाळी सणानिमित्त सुमारे १२५ कोटी रुपयांचे वितरण
schedule27 Oct 26 person by visibility 176 categoryउद्योग
वारणानगर : दिवाळी हा आनंद, उत्साह आणि समृद्धीचा सण. या सणाच्या पार्श्वभूमीवर वारणा उद्योग समूहाने शेतकरी, कामगार आणि संबंधित घटकांना आर्थिक दिलासा देत त्यांची दिवाळी गोड केली आहे. दिवाळी सणानिमित्त समूहाकडून सुमारे १२५ कोटी रुपये अदा करण्यात आले असून, या आर्थिक व्यवहारांमुळे अनेक कुटुंबांना सणाचा आनंद अधिक उत्साहाने साजरा करता येईल अशी माहिती वारणा समूहाचे अध्यक्ष डॉ.विनय कोरे यांनी दिली.
वारणा साखर कारखान्याकडील गळीत हंगाम 2025-26 मधील एफआरपी पेक्षा अधिकची प्रतिटन रु.119 जादाची रक्कम तसेच कर्मचा ऱ्यांना पगार व बोनस,दूध संघाचे फरक बील,दूध बील,याबरोबरच वारणा साखर कारखाना,वारणा दूध संघ,अमृत सेवक संस्था, सावित्री महिला संस्था,तात्यासाहेब कोरे वाहतूक संस्था,वारणा डेअरी ऍग्रो या संस्थेच्या कर्मचाऱ्यांना पगार व बोनस अदा करण्यात आला आहे.वारणा दूध संघ सभासदाना सवलतीच्या दरात तूप व कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सवलतीच्या दरात तूप,भेटवस्तू,खरेदी कुपन्सही वाटपही करण्यात आले आहे. सहकार, कृषी, दुग्धव्यवसाय आणि औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या वारणा उद्योग समूहाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याची परंपरा जपली आहे. शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, त्याच्या कष्टाला योग्य मोबदला मिळणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे उद्योगाच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कामगारांचे आर्थिक हित जपणेही आवश्यक आहे. या भूमिकेतून तात्यासाहेब कोरे साखर कारखाना,वारणा दूध संघ या प्रमुख संस्थाबरोबरच सहायकारी संस्थेच्या माध्यमातून दिवाळीच्या निमित्ताने करण्यात आलेल्या सुमारे १२५ कोटी रुपयांच्या वितरणाला दुष्काळसदृश्य परिस्थितीमध्ये विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
शेती आणि दुग्धव्यवसायाशी संबंधित शेतकरी, दूध उत्पादक तसेच उद्योग समूहातील कामगार व अन्य संबंधित घटकांसाठी आर्थिक व्यवहार वेळेत होणे ही मोठी दिलासादायक बाब आहे. सणासुदीच्या काळात घरगुती खरेदी, फराळ, कपडे, मुलांचे शिक्षण आणि इतर कौटुंबिक गरजांसाठी होणारा खर्च लक्षात घेता या रकमेचा अनेकांना उपयोग होणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या बाजारपेठेतही आर्थिक उलाढालीला चालना मिळण्यास मदत होऊ शकते.
🟣 वारणा उद्योग समूहाची वाटचाल ही केवळ औद्योगिक प्रगतीपुरती मर्यादित नसून शेतकरी, कामगार आणि ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाशी जोडलेली आहे. परस्पर सहकार्य, कष्टाचा सन्मान आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांच्या आधारावर समूहाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेतकरी आणि कामगारांच्या योगदानातून वारणा उद्योगाची यशस्वी वाटचाल होत असताना त्यांच्या आर्थिक हिताला प्राधान्य देण्यास वारणा समूह कटीबद्ध आहे.
▪️आमदार डॉ.विनय कोरे -अध्यक्ष वारणा उद्योग समूह
🟣 दिवाळीच्या निमित्ताने सुमारे १२५ कोटी रुपयांचे वितरण झाल्याने शेतकरी आणि कामगार वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होण्यास मदत झाली आहे. आनंद, आपुलकी आणि समृद्धीचा संदेश देणारी ही आर्थिक मदत अनेक कुटुंबांसाठी दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारी ठरणार आहे.
यावेळी वारणा दूध संघाचे अध्यक्ष एच.आर.जाधव, उपाध्यक्ष अँड एन.आर.पाटील,कारखान्याचे कार्यकारी संचालक एस.आर.भगत, दूध संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर आदि अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.