लक्ष्मीपुरी पोलीस लाईनच्या बांधकामामुळे ड्रेनेज लाईनची दुरवस्था नेहरू हायस्कूल परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता, विद्यार्थ्यांच्या आरोग्यास गंभीर धोका
schedule08 Dec 25 person by visibility 45 categoryसामाजिक
कोल्हापूर : दि. मोहामेडन एज्युकेशन सोसायटी (मुस्लिम बोर्डिंग), दसरा चौक, कोल्हापूर यांच्या दक्षिणेस असलेल्या लक्ष्मीपुरी पोलीस लाईनचे बांधकाम मागील दोन ते अडीच वर्षांपासून सुरू आहे. या कालावधीत नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तसेच प्रिन्सेस पद्माराजे विद्यालय आणि क्रेसेंट प्रायमरी विद्यालय या संस्थांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला, तरीही संस्थेने बांधकामास सातत्याने सहकार्य केलेले आहे.
भंगी पॅसेजमधून पूर्वापार अस्तित्वात असलेली ड्रेनेज लाईन पोलीस लाईन व मुस्लिम बोर्डिंग या दोन्हीकडून वापरली जाते. परंतु संबंधित कंत्राटदाराने कोणतीही पूर्वकल्पना न देता ही ड्रेनेज लाईन उखडून टाकली. परिणामी मैला उघड्यावर वाहू लागला असून शाळा परिसरात असह्य दुर्गंधी, अस्वच्छता व विद्यार्थ्यांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
दि. २२ जून २०२५ रोजी आर्किटेक्ट देशाई (सोनाई कंपनी) तसेच कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पुढील बाबींवर सहमती झाली होती—
1. भंगी पॅसेजकरिता ३ मीटर जागा मोकळी ठेवणे,
2. ड्रेनेजसाठी PVC (भगवी) पाईपलाईन बसविणे,
3. ३० फूट अंतरावर नवीन ड्रेनेज लाईन बांधणे.
तथापि, प्रत्यक्ष कामादरम्यान वरीलपैकी कोणतीही अट पालनात आणलेली नाही. PVC ऐवजी नित्कृष्ट दर्जाच्या “चायना पाईप” बसविण्यात आले आहेत. तसेच चेंबरच्या देखभालीसाठी आवश्यक जागा न सोडता लिकेज असलेल्या ड्रेनेजवरूनच फायर पाईपलाईन बसविण्याचे काम सुरू आहे. ही बाब तांत्रिकदृष्ट्या अयोग्य, धोकादायक व गंभीर अपघातास कारणीभूत ठरू शकणारी आहे.
सदर कंत्राटदाराकडून सातत्याने असहकार्य, निकृष्ट दर्जाचे काम आणि मान्य अटींचे उल्लंघन होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास, शाळेच्या इमारतीच्या सुरक्षिततेस व परिसरातील स्वच्छतेस गंभीर धोका निर्माण झाला आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करून संबंधित कंत्राटदाराविरुद्ध मनाई आदेश (Injunction Order) मिळविण्यासाठी न्यायालयात दावा दाखल करण्याची प्रक्रिया संस्थेमार्फत सुरू करण्यात येत आहे. सदर प्रकरण अत्यंत गंभीर असल्यामुळे आपल्या कार्यालयाकडून तातडीने आवश्यक ती कारवाई व्हावी, असे निवेदन दि. मोहामेडन एज्युकेशन सोसायटी, (मुस्लिम बोर्डिंग) चेअरमन गणी आजरेकर यांच्या तर्फे कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक, यांना देण्यात आले.
तसेच १) संबंधित कंत्राटदाराविरुद्ध तात्काळ प्रशासकीय व तांत्रिक कारवाई करण्यात यावी.
२) उखडून टाकलेली ड्रेनेज लाईन मानकांनुसार सुरक्षितपणे पुनर्स्थापित करण्याचे आदेश द्यावेत.
३) लिकेज असलेल्या ड्रेनेजवरून फायर पाईपलाईन बसविण्याचे धोकादायक काम तत्काळ थांबविण्यात यावे.
४) शाळा परिसरातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून आरोग्य व सुरक्षिततेसंबंधी तातडीची उपाययोजना करावी.
५) आमच्या संस्थेला भविष्यात होणारा त्रास किंवा तोडफोड टाळण्यासाठी संबधित विभागास योग्य मार्गदर्शन द्यावे.
असे निवेदनात म्हटले आहे.
याबाबत निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांना देण्यात आल्या आहेत.