राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच मिळणार दिवसा मोफत वीज आणि थकबाकीमुक्त प्रमाणपत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
schedule09 Aug 26 person by visibility 177 categoryराज्य
कोल्हापूर: जिल्ह्यातील कागल येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करत सौर कृषी वाहिनी योजनेला वेग देण्यात आला असून, सध्या राज्यातील ७४ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. यावर्षाअखेर ९० टक्के आणि पुढील वर्षी १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे. तसेच, प्रत्येक शेतकऱ्याला थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी देत ५६ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळवून दिला आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी शासन दरवर्षी २५ हजार कोटी रुपये खर्च करत असून ५८ हजार कोटी रुपयांची थकबाकीही शासनाने भरली आहे. तसेच, साखर कारखानदारीला बळकट करण्यासाठी इथेनॉल धोरणाला प्राधान्य दिले जात असून, 'झिरो वेस्ट' संकल्पनेतून स्पेंट वॉश व प्रेस मडपासून सीबीजी व सीएनजी निर्मितीचा देशातील पहिला एकत्रित प्रक्रिया प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे. यामुळे कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारून शेतकऱ्यांना उच्चांकी एफआरपी मिळण्यास मदत होईल.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या शेतकरी हिताच्या कार्याचे स्मरण करत, त्यांच्या विचारांवर चालत महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमादरम्यान कागल येथे हिंदूराव घाटगे विद्यालयाच्या जीर्णोद्धार कामाचा लोकार्पण सोहळा आणि लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजर्षी शाहू महाराजांचे विचार, कर्तृत्व आणि कागल तालुक्याशी संबंधित विविध विकासकामांचा आढावा घेतला. तसेच, शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची सविस्तर माहिती त्यांनी या वेळी विशद केली.
या मेळाव्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, समरजितसिंह घाटगे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.