उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.....
schedule28 Jan 26 person by visibility 147 category
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना तीव्र दुःख
महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या अकाली निधनामुळे तीव्र दुःख झाले. दिवंगत श्री अजित पवार यांच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो व पवार यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना आणि असंख्य समर्थकांना हा दुखद प्रसंग सहन करण्याचे धैर्य प्रदान करो, ही प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
माझा मोठा भाऊ गेल्याची भावना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी अविश्वसनीय आणि धक्कादायक आहे. ते माझ्यापेक्षा अनुभवाने आणि वयानेही मोठे होते. त्यांच्या निधनाने माझा मोठा भाऊ गेल्याची भावना माझ्या मनात आहे. महाराष्ट्रासाठी आजचा काळा दिवस असून एक दूरदर्शी, स्पष्टवक्ता आणि अतिशय अभ्यासू नेता आपण गमावला आहे. महायुती सरकारमधले ते केवळ माझे सहकारी नव्हते तर माझे चांगले मित्रही होते. त्यांचं अकाली जाणं जीवाला चटका लावणारं आहे, अशा भावपूर्ण शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, महाराष्ट्र त्यांना दादा म्हणून ओळखायचा आणि ते तसे होते. त्यांच्याकडे ‘वेळ’ साधण्याचा अप्रतिम गूण होता. त्यांच्या कामाचा झपाटा आणि निर्णयक्षमता आम्ही सगळ्यांनी अनुभवली आहे. मी केवळ सहकारी म्हणूनच नाही तरी मित्र म्हणून सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या पैलुंना जवळून पाहिलं आहे.
अजितदादांच्या स्पष्ट आणि नर्म विनोदी, मार्मिक कोपरखळ्यांची वैशिष्ट्ये सुद्धा सगळ्यांना आवडते. आमचे सरकार तीन पक्षांचे असले, तरीही निर्णय मात्र एकसंधपणे आणि एकजूटीने घेत आलो आहोत. विशेषतः अगदी प्रारंभीपासून राज्याची आर्थिक घडी चांगली बसावी यासाठी राज्याचा वित्तमंत्री म्हणून अजित दादांनी विकास कामांना खीळ बसू न देता अतिशय हातोटीने निर्णय घेतले. राज्यातील अनेक पायाभूत विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी मी मुख्यमंत्री असतांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो किंवा इतर काही योजना असो, उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री म्हणून अजितदादा यांनी वेळोवेळी पाठबळच दिले.
परखड आणि जिथल्या-तिथे निर्णय घेण्याची क्षमता म्हणून दादांचा महाराष्ट्राला परिचय होता. वित्तमंत्री म्हणून त्यांच्याकडे सगळ्याच खात्यांबाबत माहिती असायची. पण म्हणून त्यांनी कधी शिष्टाचाराची चौकट मोडली नाही. धोरणात्मक निर्णय जाहीर करतानाही त्यांनी कधी कुणाला अव्हेरल्याचे दिसत नाही. आपले म्हणणे ते सूस्पष्टपणे आणि अधिकारवाणीने मांडत. त्यांचा हा स्पष्टवक्तेपणा धोरणात्मक बैठका आणि विधिमंडळ सभागृहातही अनुभवायला आला.
स्वप्नाळू सादरीकरण आणि केवळ सांगोवांगी गोष्टींपेक्षा ते व्यावहारिक गोष्टी पडताळून पहात. एखादी संकल्पना पुढे आली, की तिचा ते सर्वांबाजूंनी विचार करायला भाग पाडत. ती संकल्पना टिकेल कितपत, तिच्या भविष्यातील देखभालीची व्यवस्था इथपासून, ती लोकहिताची आहे का, कितीजणांसाठी ती उपयुक्त ठरणार आहे, अशा अनेक गोष्टींचा ते विचार करत. ठोस आणि तडकपणे निर्णय घेत असल्याने विधिमंडळातील आमदार आणि मंत्रिमंडळातील होतकरू-तरूण मंत्र्यांनाही अजितदादांच्या कार्यशैलीबाबत, दैनंदिनीबाबत कुतूहल असायचे. त्यांनाही वेळप्रसंगी ठणकावयाला ज्येष्ठत्वाच्या नात्याने दादा मागे पुढे पाहत नसत. छोट्या-मोठ्या गोष्टींचाही लोकप्रतिनिधींनी विचार करायला हवा. आपल्या निर्णयाचा लोकांच्या जीवनावर कसा आणि काय परिणाम होतो, याचा अभ्यास करायला हवा असा त्यांचा आग्रह असायचा. त्यामागे चूका काढण्याची नव्हेतर, त्यांची पुनरावृत्ती होऊ नये याची तळमळ असायची.
आज दादा आपल्यात नाहीत ही कल्पना सुद्धा मनाला पटत नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेवटी म्हणतात.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जाणे महाराष्ट्रासाठी सर्वात वेदनादायी दिवस : आ. सतेज पाटील
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जाणे म्हणजे महाराष्ट्रासाठी सर्वात वेदनादायी दिवस आहे. अजितदादांचा अशा पद्धतीने मृत्यू होणे हे प्रचंड वेदना देणारे आहे. त्यांच्या जाण्याने एका कर्तत्वान नेतृत्वाला हे राज्य मुकले आहे. अशी प्रतिक्रिया विधान परिषद कॉग्रेसचे गटनेते, आमदार सतेज पाटील यांनी दिली.
कामातील बारकावे शोधून त्यावर उपाययोजना करण्यात त्यांचा हातखंडा होता. महाराष्ट्राच्या सर्वांगीन विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे. महाराष्ट्र तो कधीही विसरणार नाही. कोल्हापुरशी त्यांचे ऋणानुबंध घट्ट जोडले होते. एक उत्साही अन शिस्तप्रिय नेता महाराष्ट्राने गमावला आहे. असेही सतेज पाटील म्हणाले.