संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुखाद्य अनुदानासाठी गोकुळचा पुढाकार
schedule15 Nov 26 person by visibility 71 categoryउद्योग
🟣शासकीय मदतीसाठी संचालक मंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; संचालक मंडळाची पहिली बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
🟣सर्व संचालकांना विश्वासात घेऊन कामकाज करणार – चेअरमन राजेश पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) संचालक मंडळाची चेअरमन राजेश पाटील यांच्या निवडीनंतरची पहिली बैठक गोकुळ शिरगाव येथील प्रधान कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या बैठकीत सर्व संचालकांनी सक्रिय सहभाग घेऊन संघाच्या हितासाठी आपापली मते व सूचना मांडल्या. बैठकीला शासननियुक्त संचालकांसह सर्व संचालक, संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गोकुळच्या प्रगतीसाठी सर्व संचालकांना विश्वासात घेऊन कामकाज करणार असल्याचे चेअरमन राजेश पाटील यांनी यावेळी सांगितले. दूध उत्पादकांचे हित जपत सर्वांच्या सहकार्याने संघाची वाटचाल पुढे नेण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.
बैठकीत संघाच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. दूध संकलन व दूध विक्री घटवाढ, उत्पादन खर्च आणि आगामी नियोजनावर सविस्तर चर्चा झाली. संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आयोजनाबाबत विचारविनिमय करण्यात आला. सभेसाठी आवश्यक पूर्वतयारी आणि त्यासाठी लागणारा कालावधी विचारात घेऊन पुढील महिन्यात वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
कमी पाऊस व हवामानातील बदलांमुळे भविष्यात निर्माण होऊ शकणारी दुष्काळी परिस्थिती आणि चारा व पशुखाद्याची संभाव्य टंचाई याबाबतही चर्चा करण्यात आली. अशा परिस्थितीत दूध उत्पादकांना आधार देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून चाऱ्यासाठी मदत आणि पशुखाद्यासाठी अनुदान मिळावे, अशी मागणी करण्याचे ठरले. यासंदर्भात संचालक मंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दूध उत्पादकांचे प्रश्न मांडणार आहे. दूध उत्पादकांच्या हिताच्या शासकीय योजना शासनाच्या सहकार्याने राबविण्यासाठी गोकुळ कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
बाजारपेठेतील सध्याचा दुधाचा तुटवडा आणि राज्यातील तसेच परराज्यांतील दूध संघांनी विक्री दरात केलेली वाढ विचारात घेऊन गोकुळच्या दूध विक्री दरवाढीबाबत चर्चा झाली. याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येणार असून, दरवाढीतून मिळणारा लाभ जास्तीत जास्त दूध उत्पादकांपर्यंत पोहोचविण्यावर सर्व संचालकांचे एकमत झाले. यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादकांना दिलासा मिळेल, असा विश्वास चेअरमन पाटील यांनी व्यक्त केला.
पशुखाद्य निर्मितीसाठी तसेच दुग्धप्रक्रियेसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरातील वाढ आणि इंधनाच्या वाढत्या खर्चाचा गेल्या सहा महिन्यामध्ये संघाच्या आर्थिक स्थितीवर झालेल्या परिणामाचा आढावा घेण्यात आला. आगामी काळातील कच्च्या मालाची संभाव्य कमतरता, आवश्यक आर्थिक तरतुदी आणि खर्चाचे नियोजन यांवर चर्चा करून उपाययोजना करण्याचे सर्वानुमते ठरले.
चालू आर्थिक वर्षातील कामकाजाचा आढावा घेऊन उर्वरित कालावधीतील कामांना गती देण्यावर बैठकीत भर देण्यात आला. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून गोकुळची प्रगती पुढे नेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. बैठकीस सर्व संचालक उपस्थित राहून त्यांनी चर्चेत सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल चेअरमन राजेश पाटील यांनी त्यांचे आभार मानले.
याप्रसंगी संघाचे चेअरमन राजेश पाटील, संचालक अभिजित तायशेटे, शशिकांत पाटील चुयेकर, विरेंद्र मंडलिक, राहुल पाटील, चेतन नरके, अंबरिषसिंह घाटगे, अजित नरके, किसन चौगले, मदन देसाई, रणजितसिंह दि. पाटील, बाबासाहेब चौगले, रणजितसिंह कृ.पाटील, राहुल देसाई, विद्याधर गुरबे, अजित पाटील, कर्णसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, बाबासाहेब देवकर, विश्वजीत जाधव, राजूबाबा आवळे, शशिकांत खोत, बयाजी शेळके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ.भाग्यश्री डोंगळे, शासन नियुक्त संचालक शिवाजी आडनाईक, डॉ.प्रविणचंद्र हेंद्रे, अॅड. प्रशांत पाटोळे, कृष्णात पाटील, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.