गोकुळच्या साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त न्याय मिळू दे; सतेज पाटील यांचे गाेकुळ संचालकांना घेऊन हालसिद्धनाथाला साकडे
schedule23 Oct 26 person by visibility 299 categoryसामाजिक
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचे ठरावधारक आणि साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त न्याय मिळू दे असे साकडे काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी नूतन संचालकांसोबत शुक्रवारी आप्पाचीवाडी येथील हालसिद्धनाथाला घातले. गोकुळ दूध संघाच्या नूतन संचालक मंडळाने शुक्रवारी आप्पाचीवाडी येथील प्रसिद्ध देवस्थान हालसिद्धनाथाचे दर्शन घेतले. यावेळी आप्पाचीवाडी ग्रामस्थांच्या वतीने आमदार सतेज पाटील आणि सर्व नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला.
हालसिद्धनाथ देवाच्या आशीर्वादाने गोकुळ दूध संघामध्ये १३ संचालक निवडून आले आहेत. या विजयाबद्दल आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व ठरावधारक आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी शशिकांत आनंदराव पाटील (चुयेकर), शशिकांत खोत, राजूबाबा आवळे, अभिजित तायशेटे, प्रा. किसन चौगले, बाबासो चौगले, राहुल देसाई, विद्याधर गुरबे, बाबासाहेब देवकर, बयाजी शेळके, विश्वजीत जाधव, अंजना रेडेकर, भाग्यश्री डोंगळे आदी नूतन संचालक उपस्थित होते.
आमदार सतेज पाटील म्हणाले, "गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून जे-जे चांगले करता येईल, ते करण्याचा आमचा प्रयत्न राहील. तसेच गोकुळचे नाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात कसे उंचावता येईल, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ठरावधारक आणि साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त न्याय मिळवून देण्यासाठीच आम्ही आज हालसिद्धनाथ चरणी साकडे घातले.
आप्पाचीवाडी गावाच्या वतीने आमदार सतेज पाटील आणि सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाबुराव खोत, तानशेंद खोत, गजानन खोत, दिलीप पाटेकर, धनाजी पोटले, कुमार कापसे, आदेश आबने, कुमार खोत, योगेश पोटले, अमर चौगले, प्रविण माळी यांच्यासह गावातील ग्रामस्थ व तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.